हसणे हा सामूहिक व्यायामाचा प्रकार - डॉ. श्रुतिका कोतकुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

हास्य क्‍लबमधील खोटे हसणेही व्यक्तीला ताणतणावापासून दूर ठेवते. हसणे हा सामूहिक व्यायामाचा प्रकार आहे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी व्यक्त केले. 

गुहागर - मनुष्य हा सामाजिक प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे एकट्याने केलेल्या कृतीपेक्षा सर्वांनी एकत्र येऊन केलेली कृती अधिक आनंद, समाधान देणारी असते. हास्य क्‍लबमधील खोटे हसणेही व्यक्तीला ताणतणावापासून दूर ठेवते. हसणे हा सामूहिक व्यायामाचा प्रकार आहे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी व्यक्त केले. 

जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने ‘दै. सकाळ’शी बोलताना डॉ. कोतकुंडे म्हणाल्या की, हास्य क्‍लबमध्ये हसणे हा आरोग्याशी निगडित उपक्रम केला जातो. जो मनुष्य सदैव आनंदी, हसरा असतो तो ताणतणावापासून दूर असतो. पण ही सवय उपजत असावी लागते किंवा प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते. हास्य क्‍लबमध्ये ठरवून हसण्याची क्रिया होते. एकटा  नियमितपणे आरशासमोर उभा राहून हसण्याचा व्यायाम नियमित करू शकत नाही. त्यामुळे हसण्याने ताण दूर होत असला तरी ही उपचारपद्धती एखाद्या रुग्णांसाठी उपयोगी पडू शकत नाही. चारचौघे एकत्र आले तरच हसण्याचा व्यायाम सहज घडू शकतो. हसण्याने नाक, कान, डोळे, चेहरच्या स्नायूंना व फुफ्फुसाला व्यायाम मिळतो. हा उपक्रम सर्वांसोबत केल्याने व्यायामाचा आनंद घेता येतो. अनेकवेळा अपंग, वृद्ध व्यक्ती एकत्र येऊन अन्य व्यायाम सहजपणे करू शकत नाहीत.

योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, धावणे आदी व्यायाम अधिक दमछाक करणारे, प्रयत्नपूर्वक करावे लागणारे आहेत. 
त्याच्या तुलनेत एकत्र येऊन हसणे हा व्यायाम सहज आणि सोपा आहे. हास्य क्‍लबमध्ये हसण्याबरोबरच छोटे छोटे व्यायामही करून घेतले जातात. हलका फुलका सहज शक्‍य होणारा व्यायाम कोणत्याही वयोगटातील माणूस करू शकतो. व्यायामशाळेसारखी विशिष्ट उपकरणांची गुंतवणूक येथे करावी लागत नाही. त्यामुळे शहरातून हास्य क्‍लब यशस्वी होताना दिसतात. 

सुरवातीचा उत्साह राहिला नाही
२००७ ला रत्नागिरी शहरात प्रथमच हास्य-योग मंडळाची मुहूर्तमेढ  रोवली गेली. शिवाजी स्टेडियम येथे दररोज ६.३० ते ७.३० या वेळेत नियमित हास्य-योग सुरू होता. रत्नागिरीकरांनी देखील या नावीन्यपूर्ण उपक्रमास सुरवातीला उत्तम प्रतिसाद दिला. हास्ययोगाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात उपक्रम राबवले. कारागृहातील अधिकारी-कर्मचारी व बंदिवानांसाठी हास्ययोग शिबिर, अनाथ मुलांच्या वसतिगृहातील मुलांसाठी हास्याची प्रात्यक्षिके, जैन श्रावक संघाच्या लहान मुलांच्या शिबिरात हास्य-योगाचे प्रशिक्षण, रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून हास्य-योगासंदर्भात फोन-इन कार्यक्रम, प्रत्येक हास्यदिनादिवशी शहरातील प्रतिथयश डॉक्‍टर्स, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची हास्य-योगावरील व्याख्याने आयोजित केली होती. मात्र कालांतराने हा हास्य क्‍लब बंद पडला. जिल्ह्यात अपवादानेच हास्य क्‍लब सुरू आहेत.
 

Web Title: Ratnagiri News world laughter day special