रत्नागिरी हाय रिस्कच ; चोविस तासात आणखी 19 रुग्ण वाढले संख्या गेली 151 वर....

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

मुंबईतील कंटेनमेंट झोनमधून आलेल्या चाकरमान्यांचे नमुने पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे.

रत्नागिरी :मुंबईतील कंटेनमेंट झोनमधून आलेल्या चाकरमान्यांचे नमुने पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. शनिवारी (ता. 23) रात्री उशिरा मिरज येथून प्राप्त झालेल्या चौदा अहवालांपैकी 13 जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.तर आज सायंकाळी आणखी 6  पॉझिटीव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 151 वर पोहचली आहे. बाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

मुंबईतून चाकरमानी येण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. 18 ते 21 मे या कालावधीत मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांचे अहवाल मिरज येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील शनिवारी 13 कोरोना बाधित आहेत. त्यांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पॉझिटीव्ह सापडलेल्या तेरा रुग्णांचा मुंबई प्रवास झाल्याचे दिसत आहेत. बाधितांमध्ये रत्नागिरीत आठ रुग्ण असून 5 पुरुष  व 3 महिलांचा समावेश आहे. रत्नागिरीत नोंद झालेल्यांमध्ये स्थानिक चार, लांजा आणि राजापूर येथील प्रत्येकी दोघे आहेत. स्थानिकात रत्नागिरी हरचिरी चिंचवाडा मुळगाव असलेला तरुण वडाळा, मुंबईतून 18 ला दामले शाळेत क्वारंटाईन झाला.

भोके-मठवाडी मुळगावी जाण्यासाठी आलेली पती-पत्नी सांताक्रुझ मुंबईहून 19 मे रोजी जिल्हा रुग्णालयात आले. सांताक्रुझ मुंबईहून 19 मे रोजी करबुडे रामगडेवाडीकडे जाणारी व्यक्ती थेट जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन झाली. तसेच संगमेश्वर निवे मुळगाव असलेली एक मुंबईतून आलेली तरुणी, वाघ्रट (ता. लांजा) येथील एक मुलगा आणि वाघ्रट पाटणेवाडीतील एक व्यक्ती नालासोपारा मुंबई येथून लांजा आले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवले होते.

कांदिवलीतून राजापूरला पती-पत्नीही संस्थात्मक क्वारंटाईन होते. या सर्वांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच संगमेश्‍वर कळंबस्ते पावसकरवाडीतील महिला घाटकोपरमधून 16 मेला आली होती. तिला साडवलीत क्वारंटाईन केले होते. तिचे नमुने 21 मे ला मिरजला पाठविले होते. मानसकोंड फेपडेवाडीतील व्यक्ती विरार येथून 16 मेला साडवलीत क्वारंटाईन झाली होती. चिपळूण वाघीरे मोहल्ला येथील तरुण मुंब्रा येथून आला होता. तो सध्या वेळणेश्वरमध्ये आहे. कळंबट बौध्दवाडीतील एक व्यक्ती कांदीवलीतून सावर्डा येथे आली होता. त्यांना 18 मे पासून कामथे रुग्णालयात दाखल केले होते. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान  आज मिरज येथून आणखी 27 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील रत्नागिरी येथील 20 आणि कळंबणी येथील 1 अहवाल असे एकूण 21 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कळंबणी येथील 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ताले तालुका खेड या गावातील एका कुटुंबातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत हे सर्व मुंबई येथून दाखल झाले होते व त्यांना ताप असल्याने क्वारंटाइन खाली ठेवण्यात आले होते .  यात 2 स्त्री व 2 पुरुषअन्य दोन पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह आले हे देखील मुंबई आणि ठाणे येथून आलेले आहेत यातील ठाणे येथून आलेल्या युवकाचे गाव वरावली हे आहे तर मुलुंड येथून आलेल्या रुग्णाचे गाव दयाल तालुका खेड जिल्हा रत्नागिरी हे आहे

दोन दिवसात दहा रुग्ण झाले बरे

जिल्हा सामान्य रुग्णालयातून साखरतरचे दोन, नाखरे आणि मेर्वीतील प्रत्येकी एक असे चार जणांना घरी सोडण्यात आले. त्यात तीन पुरुष व एका महिलेसह सव्वा वर्षाचा मुलगा होता. रमजान ईद लक्षात घेऊन शनिवारी सायंकाळी आणखीन सहा रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या 48 वर पोचली आहे.

* तपासणीचे नमुने            5202
* पॉझिटिव्ह संख्या             151       
* अ‍ॅक्टीव्ह रुग्ण                  97
* निगेटिव्ह अहवाल          4737
* अपुरे स्वॅब                     24
* प्रलंबित                       282
* होम क्वारंटाईन            69,799
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ratnagiri the number of corona positive increased to 151