रत्नागिरी : तांत्रिक प्रश्नांना पत्तनकडे नाहीत उत्तरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

रत्नागिरी : तांत्रिक प्रश्नांना पत्तनकडे नाहीत उत्तरे

रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पुन्हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. पक्क्या बंधाऱ्याचे सुमारे १८९ कोटींच्या कामांसह पावसापूर्वीच्या धोकादायक भागाच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये स्थानिकांना पत्तन विभागाने विश्वासात न घेतल्याने प्रचंड नाराजी आहे. त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांनी नुकतीच पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्येही त्यांनी अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले; मात्र या विभागाकडे त्याची उत्तरे नव्हती. ही कामे दर्जेदार व्हावी आणि शासनाचा अर्थात जनतेचा पैसा वाया जाऊ नये, बंधाऱ्याचे काम नेमके कसे होणार, हे स्थानिकांना समजावून सांगा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दरवर्षी पावसाळ्यामध्ये प्रचंड धूप होते. समुद्राचे अतिक्रमण एवढे झाले आहे की, तो स्थानिकांच्या सात-बारा उताऱ्यावर आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये तर नारळाच्या बागा, छप्पर आणि घरांच्या संरक्षण भिंतीही समुद्राने गिळंकृत केल्या आहेत. अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याची तात्पुरती दुरुस्ती होते. यावर लाखो रुपये खर्च केला जातो; मात्र पावसाळ्यातील उधाणामध्ये पुन्हा काही भागांतील बंधारा वाहून जाऊन पैसा पाण्यात जातो. अखेर स्थानिकांनी पक्क्या बंधाऱ्यासाठी अनेक आंदोलने केली. मंत्री उदय सामंत यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पक्क्या बंधाऱ्यासाठी निधीची मागणी केली. त्याला तत्काळ १८९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. कामाला सुरुवातही झाली आहे. हे काम करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करा, अशी सूचना मंत्री उदय सांमत यांनी पत्तन विभागाला दिली होती; मात्र पत्तन विभागाने स्थानिकांना विश्वासात घेतलेले नाही. तांत्रिक बाबींमध्ये ग्रामस्थांनी माहिती दिल्यास काम आणखी दर्जेदार होईल, म्हणून नुकतीच मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा संघर्ष समितीमार्फत पत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

वाळा रोखण्यासाठी काही ठिकाणी ‘ब्रेकवॉटर वॉल’ बांधण्यात आली आहे; मात्र ज्या ठिकाणी जास्त उंचीच्या भिंतीची गरज आहे तिथे कमी मीटरची भिंत उभारली आहे. समुद्र पातळी जिथे घेतली आहे, तेथील वाळू वारंवार लाटांमुळे मागे जाते तिथे ‘लेव्हल’ वाढवण्याची गरज आहे, अशा काही तांत्रिक गोष्टींवर चर्चा झाली; मात्र त्याबाबत पत्तनकडे काही उत्तर नव्हते. पावसापूर्वी चार धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करण्यात येत आहे; मात्र त्यामध्ये बंधाऱ्यासाठी वापरण्यात आलेले दोनशे ते अडीचशे एमएमचे दगड टाकण्यात येणार आहेत. तिथे टेट्रापॉड टाकण्याची गरज आहे. यापूर्वी एकेक टनाचे दगड टाकूनही ते वाहून गेले आहेत. मग हे कमी वजनाचे दगड राहणार आहेत का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. टेट्रापॉड टाकूनच दुरुस्ती करण्याची मागणी आहे; परंतु टेट्रापॉड उपलब्ध नसल्याचे पत्तन विभागाने सांगितल्याची माहिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. नेमका बंधारा आणि दुरुस्तीचे काम कसे केले जाणार आहे, याची माहिती स्थानिकांना द्यावी. आमचे पूर्ण सहकार्य राहील अन्यथा आम्हाला पुढची भूमिका घ्यावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी मंजूर झालेला निधी जनतेचा आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे काम दर्जेदार होण्यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन काम झाले पाहिजे; परंतु आम्हाला याबाबत पत्तन विभागाने विश्वासात घेतलेले नाही. काही तांत्रिक बाबी विचारल्या, तर त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते. नेमके काय काम होणार, याची माहिती पत्तन विभागाने स्थानिकांना द्यावी.

- नागेश कांबळे,संघर्ष समिती पदाधिकारी

Web Title: Ratnagiri Port Does Answers Technical Questions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KokanRatnagiriSakal
go to top