esakal | रत्नागिरीत दोन दिवसांसाठी रेड अॅलर्ट; हवामान विभागाचा इशारा;
sakal

बोलून बातमी शोधा

Red alert in Pune

रत्नागिरीत दोन दिवसांसाठी रेड अॅलर्ट; हवामान विभागाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: अधूनमधून पडणाऱ्या सरींऐवजी जिल्ह्यात रविवारी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. नद्या-नाल्यांसह छोटे वहाळही दुथडी भरून वाहू लागले. पावसाबरोबर वाहणाऱ्‍या झोंबणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे रत्नागिरीकरांनी घरातच बसणे पसंत केले. हवामान विभागाकडूनही दोन दिवसांसाठी रेड अॅलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

रविवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी पाऊस ३८.०१ मिमी झाला. त्यात मंडणगड ३८.९०, दापोली- २२.९०, खेड- ११.३०, गुहागर- ७२.९०, चिपळूण- २३.५०, संगमेश्‍वर- ४१.५०, रत्नागिरी- ५१.००, लांजा- ३९.३०, राजापूर- ४०.८० मिमी नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १ हजार ९१ मिमी पाऊस झाला.

गेले अनेक दिवस उत्तर भारतात नैॠत्य मोसमी वाऱ्याचा प्रवास मंदावला होता. मागील दोन दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाल्याने पावसाला सुरवात झाली आहे. येत्या दोन आठवड्यात पडणाऱ्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याप्रमाणे शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. रविवारी (ता. ११) दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस होता; मात्र सायंकाळी वेगवान थंडगार वारे वाहू लागले आणि पावसाला सुरवात झाली.

वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला होता. मिऱ्यासह अन्य किनाऱ्यावर अजस्र लाटांचे तांडव सुरू होते. पावसाचा जोर पुढे कायम राहणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा- पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर कसे अवलंबून? जाणून घ्या नेमकं कारण

बळीराजा सुखावला

मागील आठ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. शुक्रवारपासून पावसाचे पुनरागमन झाले. सलग तीन दिवस पाऊस पडत असल्यामुळे रखडलेल्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. पाण्याची चिंता मिटली असून लावणीची कामे उरकण्याकडे कल वाढला आहे. कोरोनावर मात करत गावागावातील शेतकरी शेतामध्ये दिसू लागला.

loading image