
रत्नागिरी : दहा गावांत होणार पाणीबाणी
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणातील पाणीसाठा चार दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली अचानक सोडण्यात आला होता. त्या वेळी मोठी दुर्घटना टळली होती. अचानक आलेल्या पाण्यातून अनेकांचे कपडे, भांडी वाहून गेली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
चार दिवसांपूर्वी अचानक या धरणातून पाणी सोडण्यात आले होते. याबाबत नागरिकांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. या नदीपात्रात काही महिला कपडे धुवत होत्या आणि मुले पोहत होती. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने या महिलांनी पोहणाऱ्या मुलांना कसेतरी बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली होती.
या धरणामधून उमरे प्रादेशिक नळपाणी योजना राबवली गेली आहे. या पाणी योजनेतून परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. दुरुस्तीच्या नावाखाली चार दिवसांपूर्वी पाणी सोडल्याने आता धरणातील पाणी साठा अचानक पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसच पाणीपुरवठा होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे जवळपास दहा गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. उमरे, कळंबस्ते, हाकरवणे, भीमनगर, मलदेवाडी, भेकरेवाडी, कोंडउमरे, फणसवणे, अंत्रवली आदी गावे या योजनेवर अवलंबून असून या गावांना पाण्यासाठी कोणताही पर्याय नाही.
जागोजागी भगदाडे पडली
त्याचबरोबर धरणाची फर्शी भिंत, जेथून धरण भरल्यावर जादा पाण्याचा विसर्ग होतो ती पूर्णतः बाद झाली असून जागोजागी भगदाडे पडली आहेत. ही भिंत बाद झाल्याने पावसाळ्यापूर्वी या धरणाची डागडुगी न केल्यास पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून चिपळूण-तिवरे गावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
तहसीलदार, आमदार निकमांना निवेदन
याबाबत कळंबस्ते गावचे ग्रा. पं. सदस्य दत्तप्रसाद प्रेमनाथ पाटील यांनी तसीलदार सुहास थोरात यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे. तसेच पाणीटंचाईबाबत आणि धरणाची नादुरुस्त झालेली फर्शी (भिंत) याबाबत तत्काळ उपाययोजना करून लोकांची पाण्याची होणारी गैरसोय आणि पावसाळ्यात होणारी दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी, असे कळवले आहे. त्याचबरोबर या संदर्भात आमदार शेखर निकम यांनाही कळवण्यात आले आहे.
ही गावे योजनेवर अवलंबून..
उमरे, कळंबस्ते, हाकरवणे, भीमनगर, मलदेवाडी
भेकरेवाडी, कोंडउमरे, फणसवणे, अंत्रवली
Web Title: Ratnagiri Ten Water Villages Flooded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..