Ratnagiri Dam Mishap : आभाळ फाटले; धरण फुटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जुलै 2019

काय घडले...
धरण रात्री ९.३० वाजता फुटले 
३० फूट उंचीचा पाण्याचा लोंढा वाडीमध्ये घुसला
पाण्याच्या लोंढ्यात २४ जण बेपत्ता ४६ कुटुंबे उद्‌ध्वस्त
१३  मृतदेह हाती
धरणाच्या उंचीवरील बचावले
भेंदवाडी, आकले, कळकवणे, दादर, कादवड, फणसवाडीला दणका
बारा घरांसह मंदिर जमीनदोस्त
धरणाच्या पायथ्याशी शिळाही वाहून आल्या
धरणाखालील बाग आणि भातशेती उद्‌ध्वस्त 

‘तिवरे’च्या पाण्यात २३ जण वाहून गेले; १३ मृतदेह सापडले 
चिपळूण - सह्याद्रीच्या कुशीत झालेल्या अतिवृष्टीने आधीच कमकुवत झालेले तिवरे धरण (ता. चिपळूण) मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान फुटले आणि त्यात २३ जण वाहून गेले. यातील १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. धरणाच्या पायथ्याशी असलेली १२ घरे जमीनदोस्त झाली. अद्याप ११ जण बेपत्ता आहेत. 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री रवींद्र वायकर सायंकाळी पाच वाजता घटनास्थळी दाखल झाले. धरण फुटीची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार असून, मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. वाचलेल्या २६ जणांचे स्थलांतर सध्या गावातील एका शाळेत करण्यात आले आहे.

विध्वंसकारी लोंढा
तिवरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ५० टक्‍क्‍यांहून अधिक गाळ साचला होता. अतिवृष्टीनंतर मंगळवारी सायंकाळी धरण भरून वाहू लागले. धरणाच्या पश्‍चिम दिशेकडून पाण्याची गळती सुरू होती. तेथूनच धरण फुटले आणि रात्री पाण्याचा लोंढा बाहेर पडला. तो सुमारे ३० फूट उंचीचा होता. वाटेवरील घरे, मंदिर, विजेचे खांब जमीनदोस्त करीत लोंढा दहा किलोमीटरपर्यंत नुकसान करीत गेला. अनेक ठिकाणी पाण्याने प्रवाह बदलला. त्यामुळे वाटेवरील पाच पुलावर पाणी आले होते. भेंदवाडी आणि फणसवाडी यांना जोडणारा कॉजवे वाहून गेला. तेथून दोन मैलांवरील दोन साकव पूर्णपणे नष्ट झाले. यासह शेतीतही गाळ गेला. धरणापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील मार्गातील काही पुलांची उंची १२ ते १३ फुटांपेक्षा अधिक आहे. त्या पुलांवरूनही पाणी गेले. विध्वंसाच्या खुणा मागे ठेवून लोंढा गेला. धरण फुटल्यानंतर रात्री दादर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे चिपळूणचा आकले, रिक्‍टोली, कळकवणे, ओवळी या गावांशी असलेला संपर्क पूर्ण तुटला होता. सकाळी पाणी ओसरल्यानंतर धरणाने विध्वंस केलेली परिस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. धरण फुटल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच तिवरेकडे अनेकांनी धाव घेतली. त्यामुळे तेथे गर्दीही बरीच झाली होती. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला कडक भूमिका घ्यावी लागली. 

घरे गाळात बुजली
तिवरे धरणातील पाण्याच्या लोंढ्यात २३ जण वाहून गेले. मंगळवारी रात्री दीडपर्यंत यातील दोन मृतदेह भेंदवाडीजवळच आढळून आले. इतर ११ जणांचे मृतदेह बौद्धवाडी व तिवरे हायस्कूलसमोरच्या नदीत आढळून आले. आज सकाळपासून नदीकाठच्या गावातील लोकांनी नदीकाठी मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले होते; मात्र तेथे मृतदेह आढळले नाहीत. जोत्यासह घरे वाहून गेली आहेत. काही घरे गाळात बुजली आहेत. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या.

काय घडले...
धरण रात्री ९.३० वाजता फुटले 
३० फूट उंचीचा पाण्याचा लोंढा वाडीमध्ये घुसला
पाण्याच्या लोंढ्यात २४ जण बेपत्ता ४६ कुटुंबे उद्‌ध्वस्त
१३  मृतदेह हाती
धरणाच्या उंचीवरील बचावले
भेंदवाडी, आकले, कळकवणे, दादर, कादवड, फणसवाडीला दणका
बारा घरांसह मंदिर जमीनदोस्त
धरणाच्या पायथ्याशी शिळाही वाहून आल्या
धरणाखालील बाग आणि भातशेती उद्‌ध्वस्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ratnagiri tivare dam overflow