रत्नागिरी : कोचरी, चिंचुर्टी, कोंडगेत पाणीटंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water tanker

कोचरी, चिंचुर्टी, कोंडगेत पाणीटंचाई

लांजा: उन्हाच्या वाढत्या तीव्र झळांनी लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सद्यःस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा चटका बसणाऱ्या कोचरी भोजवाडी, चिंचुर्टी व कोंडगेमधील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, लांजा पंचायत समितीमार्फत या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

दरवर्षी शासनामार्फत पाणीटंचाई दूर करण्यासाठी लांजा तालुक्यात लाखो रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो; मात्र पाणीटंचाई अद्यापही कमी झालेले नाही. तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरदऱ्यात आणि दुर्गम भागात वसलेल्या कोचरी गावातील भोजवाडी, चिंचुर्टी गावातील धनगरवाडी आणि बौद्धवाडी तर कोंडगे धनगरवाडी या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. धावडेवाडी, भोजवाडी येथील विहिरी आटल्याने आणि पाण्याचे मुख्य स्त्रोतदेखील आटल्याने येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे.

कोचरी व कोंडगे गावांत काही दिवसांपूर्वी टॅंकर सुरू करण्यात आला. चिंचुर्टी-धनगरवाडी आणि बौद्धवाडी येथील ग्रामस्थांचे पाण्यापासून होणारे हाल लक्षात घेऊन प्रशासनाने या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र टॅंकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने या ग्रामस्थांचे पाण्यावाचून सध्या हाल होत आहेत. गावात टॅंकर पाणी घेऊन आल्यानंतर पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची अक्षरशः झुंबड उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.