
धरणातील पाणीसाठा अन् शेतीचे प्रमाण व्यस्त
खेड : तालुक्यात दहापेक्षा अधिक लहान-मोठी धरणं असून दरवर्षी पावसाळ्यात त्यामध्ये हजारो दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो; मात्र या पाण्याची व तालुक्यातील शेतजमिनीची सांगड घातली जात नसल्याने यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के पाणीसाठा निरूपयोगी असतो. अनेक धरणांमधून पाणीसाठा करण्यास सुरवात होऊन अनेक वर्षे उलटली तरी सिंचन करण्यासाठी आवश्यक कालवे बांधले गेलेले नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. राज्य सरकारने कोकणातील अशा धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेऊन त्यातून बंद कालव्याद्वारे पाणी लोकवस्ती व शेतजमिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्यास कोकणातील शेतीदेखील व्यावसायिक स्तरावर व बारमाही करणे शक्य होईल.
खेड तालुक्यात सगळ्याच विभागात शासनाने धरणांची उभारणी केली आहे. तालुक्यातील शिवतर व नातूनगर भागात नातूवाडी, शिरवली धरण प्रकल्प आहे. शिव खाडीपट्टा भागात कोंडीवली धरण, पंधरागाव विभागात तळवट, शेलारवाडी गणवाल धरण, शेल्डी धरण. सातगाव खोपी विभागात शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने पूर्णत्वास नेले आहेत; मात्र नातूवाडी व शिरगाव धरण वगळता अन्य धरणातील पाण्यातून किती हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते, हा संशोधनाचा भाग आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या धरणात अनमोल पाणीसाठा दरवर्षी होत असतो.
यावर्षी ६ जूनपर्यंत तालुक्यातील तळवट धरणात २.३०७ द.ल.घ.मी., शेलारवाडी धरणात २.१५८ द. ल. घ. मी., नातूवाडी धरणात ७.९२८ द. ल. घ. मी., पिंपळवाडी धरणात २.१०९ द. ल. घ. मी. एवढा पाणीसाठा आहे; मात्र नातूवाडी धरण सोडले तर अन्य धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी किती प्रमाणात होतो, हे तपासले तर त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळते. पिंपळवाडी धरणातील पाण्यावर खासगी वीजनिर्मिती प्रकल्प आहे; मात्र शेतीसाठी या पाण्याचा वापर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झालेले नाहीत.
पाणी साठवण क्षमता
खेड तालुक्यातील धरणे व त्यांची महत्तम पाणी साठवण क्षमता अशी ः नातूवाडी (१८.३७७ दलघमी), तळवटपाल (४.८५दलघमी), कोंडिवली (२.९६१ दलघमी), शिरवली धरण(२.९९७ दलघमी), शेलारवाडी (१०.१४ दलघमी), शेल्डी (१.६९ दलघमी), कुरवळ (२.५९ दलघमी), पिंपळवाडी(१८.८९५ दलघमी).
Web Title: Ratnagiri Water Stored In Dam And Agriculture No Irrigation Project Khed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..