रत्नागिरी : आठवडा बाजारातील उलाढालीने अर्थकारणाला गती

काेट्यवधीची उलाढाल शेतकरी व्यापाऱ्यांना फायदा
 आठवडा बाजार
आठवडा बाजारsakal

मंडणगड: कोरोना लॉकडाऊन, म्हाप्रळ-आंबेत पुलामुळे वारंवार ठप्प असणारी महानगराकडील वाहतूक यांचा सर्व क्षेत्रातील उद्योगांवर परिणाम झाला आहे. एसटी संपामुळे चार महिने ग्रामीण भागातील एसटी वाहतूक ठप्प आहे. मात्र, कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील चार आठवडा बाजार सुरू झाल्याने येथील अर्थकारणाने गती घेतली आहे. या चार बाजारांमधून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापाऱ्यांना फायदा होत आहे.

मंडणगड शहर (बुधवार), देव्हारे (मंगळवार), कुंबळे (रविवार), म्हाप्रळ (शुक्रवार) ही चार गावे तालुक्यातील प्रमुख व्यापारउदीम असलेली ठिकाणे म्हणून बदलत्या काळात पुढे आली आहे. यातील सर्वच गावात आठवडा बाजाराची परंपरा चार ते पाच दशके इतकी जुनी आहे. नेहमींच्या दुकानापेक्षा कमी भावाने वस्तू मिळणे हे बाजाराचे आणखी वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या बाजारांतील मुख्य खरेदीदार असल्याने मुख्य गावांसह आसपासच्या परिसरातील पाच-दहा गावांतील नागरिकांची किराणा सामान, सुकी व ओली मच्छी, भाजीपाला, काही प्रमाणात कपडे, भांडी व चप्पल खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली दिसून येते.

एसटी संपामुळे तालुक्याच्या ठिकाणी येण्यास कोणताच मार्ग नसल्याने बाजाराच्या दिवशी पायी चालत जाऊन बाजाररहाट करणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. सुमारे १०० दुकाने व ५ ते १५ लाखांची उलाढाल ही आकडेवारी वरकरणी लहान वाटणारी असली तरी चार बाजारांच्या माध्यमातून एका महिन्यांत सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होते. सुमारे आठ महिने बाजार चालत असल्याने आठवडा बाजारांच्या माध्यमातून तालुक्यातील उलाढाल सुमारे आठ ते दहा कोटी रुपयांच्या घरातील आहे. तालुक्याचा विचार करता ग्रामीण भागातील आर्थकारणाचे उलाढालीची ही आकडेवारी नक्कीच लक्षणीय आहे. यामुळे चार ग्रामपंचायतीचे कररूपाने मिळणाऱ्या निधीतही भरघोस वाढ झाली आहे. यातील कुंबळे वगळता सर्वच बाजारांच्या सोयीसुविधांच्या आघाडीवर बोंब आहे. मंडणगड शहरही याला अपवाद नाही.

मंडणगड शहरात तर गेल्या कित्येक वर्षांपासून आठवडा बाजाराला स्वतःची हक्काची जागासुद्धा नाही. बाजारात जागा मिळेल तेथे बसून बाजाराचे कामकाज समस्यामुक्त बाजारासाठी पुढाकाराची गरज आठवडा बाजारामुळे ग्रामपंचायतींच्या करात वाढ झाली तरी बाजारासाठी आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायती उदासीन आहेत किंवा त्यांची ताकद कमी पडत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील सर्व आठवडा बाजार हे मुख्य रस्त्याच्या रहादारीच्या ठिकाणी रस्त्याच्या आजुबाजूला भरतात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. याशिवाय बाजारासाठी सावली, बाजारात येणाऱ्यांसाठी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याचा अभाव व बाजारात येणाऱ्या वाहनाना पार्किंगची सोय नसणे या अडचणी आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींनी स्वारस्य दाखवल्यास आगामी काळात बाजारातील अर्थकारणास अधिक गती येऊ शकते.

सुरुवातीस १० ते १२ दुकाने असणाऱ्या कुंबळे आठवडा बाजाराला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या व्यापाऱ्यांसह तालुकास्तरावरील शेतकऱ्यांना सुयोग्य बाजारपेठ निर्माण करण्यात आली. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढून विकासकामांना गती मिळाली. ऊन-पावसात शेतात, रस्त्यावर भरणारा बाजार आज सोयीसुविधांनीयुक्त पक्क्या शेडमध्ये भरवण्यात येत असून नाबार्डचे विशेष सहकार्य मिळाले. ग्रामीण भागात बाजारपेठ ही संकल्पना बिंबवण्यात यश आले. नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतलेल्या श्रमाचे फलित झाल्याची समाधानी भावना आहे.

- किशोर दळवी, सरपंच कुंबळे

कुंबळे ग्रामपंचायतीने केली व्यापाऱ्यांसाठी सोय

कुंबळे ग्रामपंचायतीने सकारात्मक पावले उचलत आठवडा बाजारासाठी बाजारशेड उपलब्ध करून दिली आहे. अन्य तेथील पार्किंग रस्ता व अन्य आवश्यक सुविधाही यंदाचे वर्षी पूर्ण होतील. त्यामुळेच तालुक्यातील क्रमांक एकचा आठवडा बाजार हा कुंबळे आठवडा बाजाराने मिळवला आहे. अगदी मंडणगड शहरातील नागरिकही न चुकता कुंबळे आठवडा बाजाराला भेट देतात.

दिवसाला होणारी आर्थिक उलाढाल

कुंबळे - ग्रामपंचायत कुंबळे येथे सुमारे ५० वर्षांपासून बाजार भरतो. बाजापेठेसाठी नाबार्ड + ग्रामपंचायत यांचे अर्थसाहाय्य प्राप्त होऊन ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत बांधण्यात आली. बाजारपेठेमध्ये ९० दुकाने लावण्यात येतात. साधारणपणे बाजारादिवशी १२ ते १५ लाखांची उलाढाल होते. शेतमाल विकण्यासाठी सातारा, वाई, दापोली, बाणकोट, हर्णै, खेड, मंडणगड, कुंबळे, कुडावले, महाड येथून माल विकण्यासाठी व्यापारी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com