esakal | सिंधुदुर्गात आजपासून पुन्हा लसीकरण; 16 हजार डोस उपलब्ध 

बोलून बातमी शोधा

Re-vaccination in Sindhudurg from today kokan Marathi News

सिंधुदुर्गला पुन्हा लशींचा पुरवठा झाल्याने दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गात आजपासून पुन्हा लसीकरण; 16 हजार डोस उपलब्ध 
sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याला सोमवारी 16 हजार कोरोना प्रतिबंधक डोस मिळाले. यामुळे थोडा दिलासा मिळाला. थांबलेले लसीकरण आज (ता. 13) पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुणे येथे गेलेल्या जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून लस सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात आणण्यात आली.

जिल्ह्यात चार दिवस लस उपलब्ध नव्हती. लसीकरणासाठी जिल्ह्यात 56 केंद्रे आहेत. राखीव लस ठेवण्यात आल्याने केवळ तीन केंद्रे सुरू होती. ती सुद्धा नंतर बंद करण्यात आली होती. जिल्ह्यात यापूर्वी 66 हजार 240 डोस उपलब्ध होते, ते सर्व संपले. सुरुवातीला लस घेण्यास कोणी पुढे येत नव्हते; मात्र काही दिवसांनी नागरिक मोठ्या संख्येने पुढे येऊ लागले आहेत. 

जिल्ह्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर पोलिस, महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचे फ्रंट वर्कर्स म्हणून लसीकरण झाले. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील सर्वच व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले; मात्र साठा संपला. त्यामुळे लसीकरण थांबले होते. आता 16 हजार डोस मिळाल्याने उद्यापासून लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. 

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लशींचा साठा संपला होता. पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी आरोग्य संचालकांशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी 10 हजार मात्रा देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार 16 हजार डोस मिळाले. 
- डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक 

आणखी एक हजार रेमडेसिव्हिर मिळणार 
रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन पुरेशी उपलब्ध आहेत. अजून एक हजार इंजेक्‍शन उपलब्ध होणार आहेत. खासगी हॉस्पिटललासुद्धा इंजेक्‍शन दिली जाणार आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले. 

संपादन : विजय वेदपाठक