रत्नागिरी शहरात वाचकांना देणार घरपोच पुस्तके ः दीपक पटवर्धन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्‍टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतो; परंतु कोविड-19 महामारीचा त्रास अद्याप कमी न झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना वाचनालयात येणे कठीण जाणार आहे. वाचकांना मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच देण्याची सुविधा वाचनालय राबवणार आहे.

रत्नागिरी - जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनापासून (ता. 15) वाचकांसाठी घरपोच पुस्तक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी घोषणा अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केली. रत्नागिरी शहरापुरती ही सेवा मर्यादित असून सशुल्क आहे. वाचन प्रेरणा दिनापासून वाचनालय सुरू करण्याची परवानगी शासनाने दिल्यास त्याच दिवसापासून वाचकांना मागणीप्रमाणे पुस्तके घरपोच देऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे. 

दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्‍टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होतो; परंतु कोविड-19 महामारीचा त्रास अद्याप कमी न झाल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना वाचनालयात येणे कठीण जाणार आहे. वाचकांना मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच देण्याची सुविधा वाचनालय राबवणार आहे. ही योजना सशुल्क आहे. महिन्यासाठी 100 रुपये एवढे शुल्क आकारले जाईल. सहा महिन्यांसाठी 550 रुपये एवढी रक्कम अनामत म्हणून भरून घेतली जाईल. 

वाचकांनी वाचनालयाचे ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे. त्यातून आपल्याला हवे असणारे पुस्तक निवडून त्याचा क्रमांक वाचनालयात दूरध्वनीद्वारे अथवा मोबाईलद्वारे नोंदवावा. दुसऱ्या दिवशी किंवा सोयीनुसार हे पुस्तक सभासदाकडे पाठविण्यात येईल. जुने पुस्तक वाचकाने वाचनालयाच्या पुस्तक घेऊन आलेल्या प्रतिनिधीकडे जमा करावे.

दोनपेक्षा अधिक वेळा अथवा कमी कालावधीत पुस्तक बदलून हवे असल्यास त्या प्रमाणात शुल्क आकारले जाईल. सोसायटी, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सभासद वाचकांना इमारतीखालील प्रवेशद्वाराजवळ वाचनालयाचा प्रतिनिधी पुस्तक आणून देईल. ज्या वाचकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी वाचनालयाच्या कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत नोंद करावयाची आहे. 

ऑडिओ बुक्‍ससाठी प्रयत्न 
डिजिटल ऑडिओ बुक्‍स सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. व्यावसायिक शुल्कापेक्षा कमी शुल्कामध्ये ही योजना वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून प्रतिथयश आस्थापनेशी याबाबत बोलणे अंतिम टप्प्यात असल्याचे ऍड. पटवर्धन यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Readers In Ratnagiri City Will Get Home Delivery Of Books