
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - रेडी बंदरात दाखल त्या परदेशी जहाजाला ग्रामस्थांनी केलेल्या विरोधानंतरचा तिढा आजही कायम होता. आज हा प्रश्न पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना योग्यच असल्याचे सांगत त्यांचे म्हणणे प्रशासनाकडे पोचवून पुढील निर्णय घेण्याची ग्वाही आज दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जात असून यासाठी जिल्हा बंदीही करण्यात आली आहे. परदेशातूनही सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी घातलेली असतानाच रेडी पोर्ट येथे इंडोनेशिया येथून सिंगापूर मार्गे एक जहाज मायनिंग वाहतूक करिता दाखल झाले आहे. या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आला असून या जहाजाला परत पाठवण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचीही भेट घेतली.
रेडी येथील काही ग्रामस्थांनी माझी भेट घेतली असून त्यांच्या भावना मी प्रांताधिकारी यांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. त्यांच अस म्हणणे आहे की जर सर्वसामान्य माणूस मुंबई, पुण्यातून आल्यास आपण त्याला क्वारंटाईन करतो. जहाजातील लोक ही परजिल्ह्यातून परराज्यातून आलेले आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात नाही ही त्यांची भावना रास्त असून मी याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली आहे.
या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, ""रेडी जहाजाबाबत रोजगाराचा प्रश्न आहे. हे करत असताना सर्व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामगारांची तपासणी झाली पाहिजे हीच ग्रामस्थांची मागणी आहे आणि त्याच पद्धतीने प्रशासन पुढे जाईल.''
जहाज मुंबईवरून आले असून त्याकडे मेरिटाईमचे लक्ष आहे. जहाज दाखल होताच शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या टीमने बोटीवर जाऊन सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे. त्यांच्या अहवालानुसार त्या कामगारांना कोणताही त्रास नाही. त्यामुळे बोटीवर काम सुरू आहे. सात दिवस हे जहाज समुद्रात थांबून खनिज भरणार आहे. या कालावधीत बोटीवरील एकही कर्मचारी खाली उतरणार नाही. यासाठी जे स्थानिक 13 कामगार बोटीवर आहेत, ते काम संपल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरी सोडायचे की नाही याचा निर्णय होईल. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- प्रवीण लोकरे, तहसीलदार वेंगुर्ले.
या जहाजावर शिरोडा येथील रहिवासी काही ग्रामस्थ कामासाठी चढले असून याबाबत त्या ग्रामस्थांची कोणतीही माहिती शिरोडा ग्रामपंचायतीला देण्यात आलेली नाही. यामुळे पुढील काळात या ग्रामस्थांचा त्या जहाजावरील परदेशी कामगारांशी संपर्क येऊन यात जर कोरोनाची बाधा झाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का?
- मनोज उगवेकर, सरपंच, शिरोडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.