गोपाळगडासाठी खासदार उदयनराजेंना साकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

गुहागर - तालुक्‍यातील गोपाळगड शासनाने ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा, असे साकडे गुहागरच्या शिवतेज फाऊंडेशनने खासदार उदयनराजे भोसले यांना घातले आहे. भोसले यांनी गोपाडगडाला भेट देण्यासाठी येऊ, असे आश्‍वासन शिवतेजच्या कार्यकर्त्यांना दिले. 

गुहागर - तालुक्‍यातील गोपाळगड शासनाने ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा, असे साकडे गुहागरच्या शिवतेज फाऊंडेशनने खासदार उदयनराजे भोसले यांना घातले आहे. भोसले यांनी गोपाडगडाला भेट देण्यासाठी येऊ, असे आश्‍वासन शिवतेजच्या कार्यकर्त्यांना दिले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पदस्पर्श झालेला गोपाळगड सध्या खासगी मालकाच्या ताब्यात आहे. हा गड शासनाने ताब्यात घ्यावा म्हणून शिवतेज फाउंडेशनसह अनेक दुर्गप्रेमी अनेक वर्षे लढा देत आहेत. दोन वर्षांपूर्वी हजारो सह्यांचे पत्र शिवतेज फाउंडेशनने शासनाला दिले होते; मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे गोपाळगडाबाबत अपेक्षित हालचाली घडत नसल्याचा अनुभव ही मंडळी घेत आहेत. ही कोंडी फुटावी म्हणून शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, गौरव वेल्हाळ, अमिष कदम आणि संदीप कोंडविलकर यांनी खासदार व छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. राजधानी सातारा विकास आघाडीच्या स्थापनेत व्यस्त असलेल्या खासदार भोसले यांनी शिवतेजच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.

गोपाळगडाचा विषय समजून घेतला. या संदर्भातील दुसरी नोटीस काढण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन भोसले यांनी दिले. जिल्हा परिषद निवडणुकांच्या गडबडीतही गोपाळगडाला भेट देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recommended to udayanraje bhosale for gopalgad