समुद्राने जमिनदोस्त केलेल्या कल्पवृक्षांचे सुरू झाले पुर्नजीवन, कोकणात कुठे ते वाचा

राजेश कळंबटे
Sunday, 30 August 2020

चार दिवसांपूर्वी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीच्या लाटांनी भाट्ये किनाऱ्यांवरील नारळाची झाडे उद्‌ध्वस्त केली.

रत्नागिरी : समुद्राच्या उधाणाने उपळून पडलेली नारळाची झाडे पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये येथील रिसॉर्टधारकांनी घेतला आहे. बारा वर्षांची ही झाडे जगविण्यासाठी केलेली मेहनत वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा झाडे पुन्हा उभी राहिली आहेत. 

चार दिवसांपूर्वी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीच्या लाटांनी भाट्ये किनाऱ्यांवरील नारळाची झाडे उद्‌ध्वस्त केली. त्यामुळे झाडांचे नुकसान झाले होते. खासगी रिसॉर्टचालकाची सुमारे पस्तीस झाडे बघता बघता कोसळली होती. याचबरोबर तेथील आणखी काही झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत. वाळूमध्ये नारळाच्या झाडांची लागवड करून ती वाढविण्यासाठी गेली बारा वर्षे प्रयत्न केले होते. पडलेल्या झाडांच्या ठिकाणी ती पुन्हा लागवड करून ती वाढवणे म्हणजे दिर्घ कालावधी लागणार आहे. त्यावर घेतलेली मेहनतही वाया जाणार होती. हे लक्षात घेऊन रिसॉर्टचालकाने उपळून पडलेल्या झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खर्च येणार आहे. हा खर्च करण्याचीही तयारी त्यांनी केली आहे. जेसीबीने खड्डा खोदून पडलेली झाडे उभी करण्याचे काम हाती घेतले असून गेले दोन दिवस काम सुरु आहे. आतापर्यंत दहा झाडे उभी राहिली आहेत. खासगी रिसॉर्ट चालकांनी घेतलेल्या या भूमिकेचे पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून स्वागत होत आहे.

दृष्टिक्षेपात 

  • भरतीच्या लाटांनी कल्पवृक्ष उद्‌ध्वस्त 
  • पुनरुज्जीवनासाठी खर्च येणार 
  • जेसीबीने खड्डा खोदण्याचे काम सुरू 
  • पर्यावरणप्रेमींकडून उपक्रमाचे कौतुक

 

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rehabilitation of Kalpavriksha which demolished by sea in Konkan bey