पोलिसांचा सहृदयीपणा; दक्षतेमुळे दोन जीवांना मिळाले पुन्हा मातृछत्र

अर्जुन बापर्डेकर
Monday, 14 September 2020

एवढ्या लहान वयात मुलगा घरातून पळून का गेला? याबाबत कळेकर यांनी तपासाचे आदेश दिले. हवालदार सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, कांबळे यांनी तपास सुरू करताच मुलांच्या वडिलांचे प्रताप उघड झाले. 

आचरा (सिंधुदुर्ग) - पतीच्या जाचाला कंटाळून पाच वर्षांपूर्वीच घर सोडलेल्या आईच्या मायेला पोरकी झालेल्या दोन मुलांना मद्यपी बापही त्रास देऊ लागला. मायेची नाती जीवावर उठल्याने सहनशीलता संपलेल्या एका मुलाने घर सोडले. पोलिसपाटलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे मुलाला मातृछत्र मिळाले. शिवाय दारुड्या बापामुळे आयुष्य उद्‌ध्वस्त करायला निघालेल्या मुलाला चांगल्या मार्गावर आणले. या सर्व प्रकरणात पोलिसांच्या मात्र सहृदयीपणाचे दर्शन झाले. 

चिंदर गावातील एक पंधरा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसपाटील दिनेश पाताडे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांना दिली. याबाबत नातेवाईकांनी तक्रारही दाखल केली नव्हती; पण एवढ्या लहान वयात मुलगा घरातून पळून का गेला? याबाबत कळेकर यांनी तपासाचे आदेश दिले. हवालदार सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, कांबळे यांनी तपास सुरू करताच मुलांच्या वडिलांचे प्रताप उघड झाले. 

पोलिसांनी सांगितले, की व्यसनामुळे पती मारहाण करत असल्याने पत्नीने घर सोडले. आपला छोटा भाऊ आणि आजी-आजोबांसोबत राहणारा हा मुलगा मुळातच अभ्यासात हुशार होता; पण वादन, पोहण्यातही तरबेज होता. खेकडे पकडण्यातही तो हुशार होता; मात्र त्याने पकडून आणलेले खेकडे विकून दारू पिणे एवढेच वडिलांचे काम. दारू पिल्यानंतर वयोवृद्ध आई-वडिलांसह या मुलांनाही तो मारहाण करीत असे. त्यामुळे मोठ्या मुलाने घर सोडल्याची माहिती समजल्याने पोलिसांनी या मुलाचा शोध सुरू केला. काहींनी त्या मुलाबाबत माहिती गोळा केली.

चिंदर ग्रामस्थ दीपक सुर्वे यांना देवगडमध्ये एक मुलगा अंगणात झोपल्याची माहिती कुणीतरी दिली. बेपत्ता तोच मुलगा असल्याचे समजताच त्याला पोलिस स्टेशनला आणले. मुलाला वडिलांच्या ताब्यात दिल्यास त्याचे आयुष्य उद्‌ध्वस्त होईल, ही भीती होती. यामुळे कळेकर साहेबांनी सदर मुलांच्या आईशी सातारा येथे संपर्क साधला. सदर महिला पतीचे घर सोडून गेल्यानंतर न खचता साताऱ्यात नोकरी करत असल्याचे समजले. मुलांना सोबत आणण्याचा प्रयत्न होता; पण पतीचा विरोध होता, हे तिच्याकडून समजले. दोन मुलांची जबाबदारी घेण्यास ती समर्थ असल्याने या मुलांना तिच्या ताब्यात देण्याचा निर्णय कळेकर यांनी घेतला. 

उद्‌ध्वस्त होता होता वाचले 
पोलिस स्टेशनला तक्रार दाखल होण्याची वाट न बघता पोलिसपाटलांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहकाऱ्यांच्या साथीने त्या मुलाचा वेळीच शोध आचरा पोलिसांनी घेतल्याने कोवळ्या वयातच आयुष्य उद्‌ध्वस्त होता होता वाचले. शिवाय मुलांना पुन्हा मातृछत्र मिळवून देण्याचे काम आचरा पोलिसांनी केले. त्यांच्या या सहृदयपणामुळे कोवळ्या जीवांना मायेचे छत्र मिळाले.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Release of children from father's persecution konkan sindhudurg