पूर्णगड किल्लाचे नुतनीकरण; लवकरच पर्यटनासाठी होणार खुला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. तो राज्य संरक्षित झाल्यानंतर या किल्ल्याची मुळ स्वरूपात डागडुजी करण्याचा निर्णय झाला. पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळून 4 कोटी 91 लाख रुपये मंजूर झाले.

रत्नागिरी - शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये आहे. त्यापैकीच एक पूर्णगडचा किल्ला. पडझडीमुळे या किल्ल्याचे मुळ स्वरूपच लोप पावत चालले होते. मात्र हा किल्ला राज्य संरक्षित झाला आणि किल्ल्याचे रूपडेच पालटले. सुमारे 4 कोटी 91 लाख रुपये खर्च करून मुळ रूपात त्याचे जतन केले जात आहे. डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार असून किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार 
आहे. 

या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. तो राज्य संरक्षित झाल्यानंतर या किल्ल्याची मुळ स्वरूपात डागडुजी करण्याचा निर्णय झाला. पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय विभागाच्या प्रस्तावाला मंजूरी मिळून 4 कोटी 91 लाख रुपये मंजूर झाले. लातूरच्या साई प्रेम कन्स्ट्रक्‍शन कंपनीला त्याचा ठेका दिला. कंपनीने आतापर्यंत 4 कोटी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पडझड झालेल्या भिंती बांधून घेतल्या आहेत. याचा काही भाग कोसळला होता. त्याची दुरुस्ती आणि ढासळलेला पाया दुरुस्त केला आहे. तटबंदीचे कामही पूर्ण झाले असून त्यावर वॉकिंग ट्रॅक तयार केला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरनंतर हा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. 

पूर्णगड, गोवा किल्ल्यासाठी दोन कर्मचारी 
पूर्णगड आणि गोवा किल्ला (ता. दापोली) या किल्ल्यांच्या देखभालीसाठी पूर्णवेळ दोन कर्मचारी मिळाले आहेत. त्यामुळे किल्ल्यांची चांगली देखभाल होणार आहे, अशी माहिती पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वाहने यांनी दिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renovation Of Purnagad Fort Will Be Open For Tourism Soon