गणेशोत्सवास येणाऱ्या चाकरमान्यांसाठी २२०० फेऱ्यांचे एसटीचे आरक्षण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याकरिता मुंबईकर चाकरमान्यांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आता फक्त ११ दिवस राहिले असून मुंबईतून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता २२०० फेऱ्यांचे आरक्षण झाले आहे. रत्नागिरीतून परतीसाठी १३०० फेऱ्यांचे नियोजन झाले आहे.

रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याकरिता मुंबईकर चाकरमान्यांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आता फक्त ११ दिवस राहिले असून मुंबईतून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता २२०० फेऱ्यांचे आरक्षण झाले आहे. रत्नागिरीतून परतीसाठी १३०० फेऱ्यांचे नियोजन झाले आहे.

रत्नागिरीत येत्या २८ ऑगस्टपासून चाकरमानी यायला सुरवात होणार आहे. या दिवशी ११ फेऱ्या, २९ ला ५२, ३० ला ३७४, ३१ ला सर्वाधिक १४८५, १ सप्टेंबरला २७९ फेऱ्यांमधून चाकरमानी दाखल होणार आहेत. यंदा ८५२ फेऱ्यांचे ॲडव्हान्स बुकिंग व १३४८ फेऱ्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.

या व्यतिरिक्त रत्नागिरी एसटी विभागातून ५२ जादा फेऱ्या सोडल्या जाणार आहेत. नियमित १५० फेऱ्यांमधून चाकरमान्यांना फिरता येणार आहे. तसेच प्रभारी विभाग नियंत्रक संतोष बोगरे यांनी सर्व आगार व्यवस्थापकांची बैठक घेतली आहे. यामध्ये पालक अधिकारी यांची नेमणूक केली आहे. महामार्गावरील एसटीची सर्व उपाहारगृहे २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची सूचना केली आहे.

विसर्जनानंतर परतीच्या फेऱ्या
गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून एसटीच्या १३०० फेऱ्या चाकरमान्यांना घेऊन परतल्या होत्या. यंदा ८ सप्टेंबरला गणेश विसर्जनानंनतर परतीच्या फेऱ्या सुरू होतील. आतापर्यंत ११०० फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध असून ऑनलाईन आरक्षण सुरू आहे.

एसटीचा २४ तास नियंत्रण कक्ष
एसटीतर्फे कशेडी चेक पोस्ट, चिपळूण, शिवाजीनगर येथे क्रेन, गस्ती पथक कार्यरत राहणार आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरीमध्ये यांत्रिक कर्मचाऱ्यांची दुरुस्ती व्हॅन २४ तास सेवा बजावत राहणार आहे. माळनाका येथे विभागीय वाहतूक विभागामध्ये एसटीचा २४ तास नियंत्रण कक्ष चालू राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reservation of 2200 round ST for the attendants of Ganeshotsav