सरपंचपदाची आरक्षण सोडत २५ जानेवारीला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

सोडत सकाळी अकरा वाजता तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काढणार आहे. 

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या 15 ला मतदान होणार असून आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सरपंचपदाची आरक्षण सोडत 25 जानेवारीला काढण्याचे निश्‍चित केले आहे. सोडत सकाळी अकरा वाजता तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काढणार आहे. 

निवडणुकीपूर्वी सरपंचपदाची सोडत काढण्यात येते; मात्र निवडणुकीतील घोडेबाजार थांबवण्यासाठी ही सोडत मतदान व निकालानंतर काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ग्रामविकास विभागाच्या 6 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित केले आहे. मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2- अ (1)(2) नुसार पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी कोटा निश्‍चित केला आहे. 

हेही वाचा - बेळगाव :  एप्रिल ते ऑक्‍टोबरची आकडेवारी; २५ बाधित गर्भवती, ४९ प्रसूती यशस्वी
 

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या घोषित निवडणूक कार्यक्रमाच्या मतदानानंतर सरपंच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत आणि पुर्नवसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयी सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता, कार्यालयाकडील 2 डिसेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना विचारात घेऊन सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reservation of sarpanch of gram panchayat in ratnagiri