आदिमानवाची वस्ती कणकवलीतील कोळोशी येथे असल्याचे सापडले पुरावे

अनंत पाताडे
Friday, 10 May 2019

कणकवली - कोकणातील प्राचीन मंदिरे वगळून कोकणला फारसा पुरातन इतिहास नाही, असा गैरसमज असताना याला छेद देणारे संशोधन पुरातत्व वस्तुसंग्रहालयतर्फे कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे केले आहे. कोळोशीमधील गुहेमध्ये आदिमानवाची वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत.

कणकवली - कोकणातील प्राचीन मंदिरे वगळून कोकणला फारसा पुरातन इतिहास नाही, असा गैरसमज असताना याला छेद देणारे संशोधन पुरातत्व वस्तुसंग्रहालयतर्फे कणकवली तालुक्यातील कोळोशी येथे केले आहे. कोळोशीमधील गुहेमध्ये आदिमानवाची वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत.

इसवी सनपूर्व दहा हजार ते चाळीस हजार वर्षांपूर्वी आदिमानव या भागात रहात होता हे निश्चित झाले आहे. कोकणात आदिमानवाची वस्ती होती, असा लावलेला हा पहिलाच अधिकृत शोध आहे.

अश्मयुगीन काळात वापरली जाणारी दगडी हत्यारे कोळोशी येथील गुहेत सापडली होती. यामुळे तातडीने या संशोधनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय कोळोशीच्या सरपंच ऋतिका सावंत तसेच ग्रामस्थांनी सतत या गुहे संदर्भातला पाठपुरावाही शासन स्तरावर सुरू ठेवला होता.

या गुहेस भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओहोळ या गुहेतून जातो. या गुहेतील पुरातन ठेवा नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने तातडीने पाऊले उचलत येथे संशोधन करण्याची परवानगी दिली आहे. याकामी कोळशीच्या सरपंच ऋतिका सावंत यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे.

विविध प्रकारचे हत्यारे सापडली

संशोधनामध्ये विविध प्रकारची हत्यारे शिकारीसाठी वापरात येणारे बाणांची टोके तसेच मांस कापण्यासाठी केलेली दगडी हत्यारे सापडली आहे. ही सर्व हत्यारे पुढील संशोधनासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहेत.

गुहेचा इतिहासातून पर्यायाने कोकणातील आदिमानवाच्या वस्तीच्या इतिहासावर आणखी प्रकाश पडणार आहे. कोकणात इतिहासपूर्व काळातील संशोधन फारसे नाही. असे असताना पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केलेले हे संशोधन फार मोलाचे ठरणार आहे.

कोकणला इसवीसन पूर्व चाळीस हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे आणि येथे आदिमानव यांची वस्ती होती हे उघड झाले आहे. हा आदिमानव प्राण्यांची शिकार करून व कंदमुळे खाऊन गुहेत राहत होता. हे तेथील उत्खननावरून उघड झाले आहे. पुढील संशोधनात काय उघड होते याची उत्सुकता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळोशी येथे उत्खनन करण्यात येत आहे. यामध्ये अश्वयुगीन कालखंडातील काही पुरावे सापडले आहेत. हे उत्खनन प्राथमिक अवस्थेत आहे. कोकणात अशी उत्खनने झाली नाहीत. पुरातत्व विभागातर्फे असे उत्खनन प्रथमच होत आहे. 

- डॉ. तेजस गर्जे, संचालक, पुरातत्व वस्तू संग्रहालय

कातळ शिल्पांचा शोध घेत असताना आम्हाला गेल्यावर्षी या गुहेबद्दल माहिती मिळाली. सात तारखेपासून या ठिकाणी आम्ही उत्खनन सुरु केले आहे. डिसेंबरमध्ये रत्नागिरीत कार्यशाळा झाली होती तेव्हा ही गुहा पाहण्यासाठी पार्थ चव्हाण यांच्यासह काही संशोधक येथे आले होते. या तज्ज्ञांनी ही गुहा प्राचिन कालखंडातील असावी असे मत व्यक्त केले होते.

- ऋत्विज आपटे, पुरातत्व संशोधक 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: resident of Primitive in Koloshi in Kanvali district