जिल्हा नियोजनमधून मास्क वाटण्यास विरोध

विनोद दळवी 
Tuesday, 27 October 2020

हा ठराव जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना पाठविण्यात यावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती पाठोपाठ आरोग्य समितीमध्ये मास्क व सॅनिटायझर वाटपाला विरोध करणारा ठराव घेण्यात आला आहे. 

ओरोस (सिंधुदुर्ग)  जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरी मास्क व सॅनिटायझर आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनमधून जिल्ह्यातील नागरिकांसाठी वितरीत करण्यात येणारे मास्क व सॅनिटायझर वितरीत करण्यात येवू नयेत, असा ठराव आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना पाठविण्यात यावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती पाठोपाठ आरोग्य समितीमध्ये मास्क व सॅनिटायझर वाटपाला विरोध करणारा ठराव घेण्यात आला आहे. 

सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झालेल्या या सभेला सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे, सदस्य लॉरेन्स मान्येकर, उन्नती धुरी, शर्वाणी गावकर, नूतन आईर आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी मास्क व सॅनिटायझर वाटपची आता गरज नाही. ज्यावेळी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यावेळी लोकांना याची गरज होती; मात्र आता लोकांच्या घरात या दोन्ही वस्तु उपलब्ध आहेत. तरीही मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आली तर सुमारे पाच ते सहा कोठी रुपये वाया जाणार आहेत. त्यापेक्षा या निधितुन अन्य आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी यावेळी लॉरेन्स मान्येकर यांनी केली. 

वैभववाडीचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी केलेला प्रकार आरोग्य विभागाला डाग लावणारा आहे. त्यामुळे त्यांची बदली जिल्ह्याबाहेर करावी, अशी मागणी लॉरेन्स मान्येकर यांनी केली. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे म्हणाले, ""संबंधित डॉक्‍टर हे पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना त्यांच्या विरोधात तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांची बदली वैभववाडी येथे करण्यात आली. 1 ऑक्‍टोबरला त्यांच्या विरोधात पुन्हा तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अहवाल तयार करण्यात आला आहे.

सध्या त्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्याबाहेर बदली करण्याचा अधिकार आमचा नाही. तो अधिकार शासनाचा आहे. त्यामुळे आम्ही याबाबत शासनाला कळवितो.'' जिल्ह्यात या महिन्यात घेण्यात आलेल्या 717 पाणी नमुन्यातील 93 नमूने दूषित आले असून ही टक्केवारी 12.97 टक्के आहे. यात देवगड व मालवण तालुक्‍यात जास्त नमूने दूषित आढळले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी लॉरेन्स मान्येकर यानी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त परिचर आकडेवारी देण्यात यावी, अशी मागणी केली. 

माकडतापसाठी नियोजन सुरू 
जिल्ह्यात गेली अनेक वर्षे असलेला माकडताप आजाराच्या लागणीचा कालावधी जवळ येत आहे. त्यामुळे आरोग्य सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्‍यात आढावा बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या माकडताप औषधे पुरेशी उपलब्ध आहेत, असे यावेळी डॉ. खलिपे यानी सांगितले. 

जिल्हा रुग्णालयाला 5 लाख देण्यास नकार 
पश्‍चिम देवस्थान समितीकडून कोरोना उपचारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. सुरूवातीला हा निधी जिल्हा रुग्णालयात वर्ग करून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन घेण्याच्या निर्णय घेण्यात आला होता; परंतु जिल्हा नियोजनकडे 23 कोटी 50 लाख रुपये निधी आहे. यातील 8 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिल्लक निधी मोठ्या प्रमाणात आहे. आता कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे हा निधी जिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने ठेवलेल्या ठरावाला सभापती सौ. लोके व लॉरेन्स मान्येकर यांनी विरोध केला. हा निधी जिल्हा परिषदेकडे ठेवून आरोग्य सुविधांसाठी खर्च करावा, असा ठराव घेण्यात आला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Resolution not to distribute masks in Sindhudurg