esakal | आर्थिक कमाईपेक्षा समाधानास महत्त्व देत रेवडेकर भगिनींनी जोपासलाय मूर्तिकलेचा वारसा 
sakal

बोलून बातमी शोधा

Revdekar Sister Preserve Ganesh Idol Making Art Sindhudurg

उच्चशिक्षित रेवडेकर भगिनींनी मूर्ती आणि रंगकामातून कलेचा आनंद लुटत वडिलांचा हा वारसा पुढे जोपासला आहे. 
कोकण म्हणजे कलेचं माहेरघर. या कोकणात अनेक रत्ने जन्माला येतात.

आर्थिक कमाईपेक्षा समाधानास महत्त्व देत रेवडेकर भगिनींनी जोपासलाय मूर्तिकलेचा वारसा 

sakal_logo
By
भूषण आरोसकर

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - फुलाला रंग हवा असतो, मातीलाही गंध हवा असतो, माणूस तरी कसा जगणार, त्यालाही एखादा छंद असावा लागतो. याच धर्तीवर मूर्तिकलेचा छंद जोपासताहेत कसाल येथील रेवडेकर भगिनी. आजोबांपासून सुरू झालेला हा मूर्तिकलेचा वारसा वडिलांनी अखंडपणे पुढे चालवला.

उच्चशिक्षित रेवडेकर भगिनींनी मूर्ती आणि रंगकामातून कलेचा आनंद लुटत वडिलांचा हा वारसा पुढे जोपासला आहे. 
कोकण म्हणजे कलेचं माहेरघर. या कोकणात अनेक रत्ने जन्माला येतात. किंबहुना कोकणात कलाकार घडतात, असे म्हटले जाते. गणेशोत्सवानेही अनेक कलाकारांना नावारुपास आणले. मूर्तिकलेनेही अनेकांच्या जीवनाला सावली दिली.

मूर्तिकलेला अलीकडच्या काळात व्यवसायाचे स्वरूप जरी येत असले तरी मूर्तिकला ही केवळ छंद म्हणून जोपासणाऱ्या रेवडेकर भगिनींचे कलाप्रेम वाखाणण्याजोगे आहे. कसाल (ता. कुडाळ) बाजारपेठेतील महादेव रेवडेकर यांच्या भाग्यश्री आणि ऋचिरा या दोन कन्या आहेत. यातील भाग्यश्री ही एमएडीएड आहे तर ऋचिरा ही इंजिनिअर आहे. वडिलांचे विविध व्यवसाय असून त्यासाठी वेळ देणे शक्‍य नसतानाही वडिलोपार्जित मूर्तिकलेचा वारसा रेवडेकर कुटुंबीय अखंड जपत आहेत. 

या भगिनींच्या आजोबांच्या काळात सुमारे 700 ते 800 गणेशमूर्ती येथील चित्रशाळेत बनवल्या जायच्या. त्यांच्या निधनानंतर कालांतराने या भगिनींचे वडील महादेव रेवडेकर गणेशमूर्ती रंगवायचे. परंतु वडिलांना विविध व्यवसायांमुळे गणेशमूर्तींसाठी वेळ देता येत नाही, ही बाब विचारात घेऊन या दोन्ही मुली गणेशमूर्ती घडवण्यात वडिलांना मदत करू लागल्या आहेत. 

आर्थिक परिस्थिती चांगली असूनही वयाच्या 75 व्या वर्षीही वडील मूर्तिकाम, रंगकाम करत आहेत. ऋचिरा आणि भाग्यश्री त्यांना रंगकाम व मूर्तिकामात मदत करतात. या दोघींचेही पुढील शिक्षण सुरू आहे. तरीही वेळात वेळ काढून त्या मूर्तिकलेचा छंद जोपासत आहेत. वयाने लहान असणारी रिद्धी रेवडेकरही आता आवडीने रंगकाम शिकत आहे. 

14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणून गणरायाला संबोधले जाते. त्याच गणरायाची पूजा गणेश मूर्तिकलेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे रेवडेकर कुटुंबीय करत आहोत. वयानुसार मलाही मूर्तिकलेला झोकून घेणे जमत नाही, परंतु माझ्या मुली मला मदत करतात. या कलेतून समाधान मिळते. 
- महादेव रेवडेकर 

"" कलेलाही अलीकडे व्यावसायिक स्वरूप येऊ लागले आहे; परंतु आर्थिक कमाईपेक्षा त्यातून मिळणारा आनंद हा पैशात न मोजता येणारा आहे. आपल्या हातून एखादी मूर्ती घडते, तिच्यात कलाकाराने जीव ओतल्यानंतर तिला देवत्व प्राप्त होते, ही भावना समाधान देणारी असते.'' 
- भाग्यश्री रेवडेकर, मूर्ती कलाकार