
पाली : रायगड जिल्ह्यामध्ये विखूरलेली व तुकड्यांची शेती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीतून उत्पादन घेणे खूपच अवघड जाते. शिवाय यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्यातच अनेक ठिकाणी पाणी नसल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र मंडळा शेतीच्या माध्यमातून कमी जागेत भरघोस उत्पन्न घेऊन श्रम व पाण्याची बचत करता येते. आणि नैसर्गिक जैवविविधता देखील जोपासली जाते. मंडळा शेतीचा अनोखा प्रयोग सुरु केला आहे, सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी व इको टुरिझम कर्ते तुषार केळकर यांनी. पर्माकल्चर पद्धतीमध्ये मंडळा शेती हा एक प्रकार येतो. आणि तुषार केळकर यांनी पर्माकल्चर व त्यामध्ये येणारे मंडळा शेती प्रकार व इतर प्रकार यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले असून याबाबतचा कोर्स देखील पूर्ण केला आहे.