खोपोलीत पहिल्याच पावसात कोसळली दरड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच 'दैनिक सकाळ'ने खोपोलीतील दरडग्रस्त रहिवासी भागाबाबत वृत्त दिले होते. तसेच दरड कोसळू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यास या भागात दरड कोसळण्याची शक्यता वर्तविली होती.

खोपोली : मुसळधार पाऊस सुरू असतानाच डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या आकाराचे दगड, मातीचा ढिगारा लागला होता. डोंगरालगत असलेल्या कमला रेसिडेन्सी परिसरात ही घटना घडली. मात्र, यामध्ये कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नसून या घटनेमुळे खोपोली नगरपालिका, महसूल विभागाच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच 'दैनिक सकाळ'ने खोपोलीतील दरडग्रस्त रहिवासी भागाबाबत वृत्त दिले होते. तसेच दरड कोसळू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना न केल्यास या भागांत दरड कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. 'दै. सकाळ'ची ही शक्यता खरी ठरली. आज (शुक्रवार) झालेल्या पहिल्याच पावसात काजूवाडी भागात एक भलीमोठी दरड कोसळल्याने रहिवाशांची झोप उडाली आहे.

अनियंत्रित माती उत्खनन व धोकादायक ठिकाणी केलेल्या बांधकामामुळे खोपोलीतील सुभाष नगर, काजूवाडी, सहकार नगर, वर्धापननगर, मोगलवाडी या रहिवासी भागात दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत पावसाळा सुरू होण्यापूर्वी 'सकाळ'ने सविस्तर वृत्त दिले होते. तसेच अनियंत्रित माती उत्खनन करणारे आणि धोकादायक ठिकाणी बांधकाम करणाऱयांवर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते.  

डोंगराच्या कडेला धोकादायक ठिकाणी बांधकाम करणाऱ्यांवर नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत. येथील अनधिकृत बेसुमार माती उत्खननाबाबतही संबंधित अधिकारी व विभागांना माहिती दिली. मात्र, कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज दरड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नसली तरी, नगरपालिका, महसूल विभाग व स्थानिक नेत्यांनी आतातरी जागे होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले व संभाव्य मोठ्या दुर्घटनेचे संकेतही दिले आहेत.
- प्रवीण क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ता, खोपोली 

दरड कोसळण्याची माहिती मिळताच नगरपालिका आपत्कालीन विभाग व अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. यामध्ये कोणतेही नुकसान अथवा दुर्दैवी घटना घडली नसून याबाबत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले आहेत. त्यानंतर तत्काळ योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. गरज पडल्यास रहिवासी भागातील नागरिकांना धोकादायक स्थळापासून सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rift collapse in Khopoli