लॉकडाउनच्या कडक अंमलबजावणीसाठी कुठे दाखल होणार दंगल पथक

राजेश शेळके
मंगळवार, 30 जून 2020

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तो रोखण्यासाठी 1 ते 8 जुलै या दरम्यान ऑपरेशन "ब्रेक द चेन' राबविण्यात येणार आहे.

रत्नागिरी : एक तारखेपासून जिल्ह्यात सुरू होणाऱ्या आठ दिवसांच्या लॉकडाउनसाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्याच्या पाच सीमा सील करण्यात येणार असून, कशेडी घाटात दंगल नियंत्रण पथकासह दोन चौक्‍या लावण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य होणार आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 662 पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा तगडा बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी आज "सकाळ'ला दिली. 

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तो रोखण्यासाठी 1 ते 8 जुलै या दरम्यान ऑपरेशन "ब्रेक द चेन' राबविण्यात येणार आहे. यावेळी कडकडीत लॉकडाउन करण्यात येणार आहे. याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाची खास बैठक झाली. यानुसार जिल्ह्यात प्रवेश करता येईल, असे पाचही मार्ग रोखले जाणार आहेत. आंबा घाट, कुंभार्ली घाट, कशेडी, हातीवले, म्हाप्रळ या ठिकाणी पोलिस पथके नेमली आहेत; मात्र सर्वांत जास्त कशेडी घाटात गर्दी होते. गेल्या तीन महिन्यांचा अनुभव घेता, या ठिकाणी दोन पथके तैनात केली जाणार आहेत. दंगल काबुत पथकही नेमले जाणार आहे. मुंबईकडून येणाऱ्यांना कशेडीआधी एक किलोमीटर एक पथक असेल. ते विनापास येणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवेल. दुसरे पथक पास तपासणी करून वाहनधारकांना प्रवेश देईल. गर्दी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने हा आराखडा केला आहे. 

रत्नागिरीतही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मारुती मंदिर, परटवणे, काजरघाटी, भाट्ये आदी ठिकाणी पोलिस तपासणी केंद्र असणार आहेत. वाहतूक पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात 18 पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बंदोबस्त असणार आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, निरीक्षक, सहायक निरीक्षक, कर्मचारी, होमगार्ड, असा 662 जणांचा बंदोबस्त असणार आहे. पोलिसमित्र आणि एनसीसी कॅंडिटेट मदतीला असणार आहेत. सायंकाळी 5 ते सकाळी 9 या दरम्यान कडक संचारबंदी असणार आहे. अत्यावश्‍यक सेवेमध्ये मोडणाऱ्या वृतपत्र क्षेत्रातील अंक वितरकांपासून स्टॉलधारकांपर्यंत साऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे, मात्र त्यासाठी ओळखपत्र आवश्‍यक असणार आहे, असे पोलिस यंत्रणेने सांगितले. 

असा बंदोबस्त 

  • जिल्हा उपाधीक्षक - 4 
  • निरीक्षक- 18 
  • सहायक निरीक्षक- 40 
  • पोलिस शिपाई- 500 
  • होमगार्ड- 100 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A riot control squad will arrive in Ratnagiri district