सावधान ! एसटीतील गर्दीने कोरोना संसर्गाचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

लॉकडाउनमुळे सुमारे चार महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) प्रवासी वाहतूक बंद होती. पहिल्या टप्प्यात लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात काही मार्गावर बस सुरू केल्या होत्या.

चिपळूण ( रत्नागिरी) - चिपळूण - पोफळी मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहनांमधील वाढती गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

लॉकडाउनमुळे सुमारे चार महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) प्रवासी वाहतूक बंद होती. पहिल्या टप्प्यात लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात काही मार्गावर बस सुरू केल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातही एसटीची सेवा सुरू झाली आहे. चिपळूण आगारातून तालुका ते जिल्हा आणि ग्रामीण अशी प्रवासी वाहतूक सुरू आहे. पोफळी मार्गावर सध्या एसटीच्या आठ फेऱ्या धावत आहेत. 

खासगी वाहतूक बंद असल्यामुळे या फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी वाढत आहे. सकाळी पोफळीतून चिपळूणला येताना आणि सांयकाळी चिपळुणातून पोफळीकडे जाताना प्रवाशांची गर्दी होत आहे. कोरोनामुळे केवळ 22 प्रवाशांची वाहतूक करण्याचे बंधन असले तरी संपूर्ण एसटी भरली जाते. प्रवासी उभ्याने प्रवास करीत आहेत. तिकीटदरात कोणत्याच प्रकारची वाढ केली नाही. त्यामुळे प्रवासी एसटीला पसंती देत आहेत. वाहकाकडून प्रवाशांना वारंवार मास्क लावण्याची सूचना केली जाते; मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे एसटीतील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती जास्त आहे. 

ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. सध्या सुरू असलेल्या बस अपुऱ्या असल्यामुळे जादा बस सोडण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. 
- सुनील पवार, कंट्रोलर चिपळूण आगार 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk Of Corona Congestion In State Transport In Chiplun