पर्यटकांच्या गर्दीने संसर्ग वाढण्याचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

जिल्ह्यात शनिवारी सुमारे 232 कोरोना चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्या तुलनेत गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी होत आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या परत घटल्या आहेत. गेल्या 24 तासात 54 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी फक्त 3 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत तर 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नसला तरी मृत्यूदर 3.71 वर स्थिर आहे. धार्मिक स्थळे खुली केल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन झाले नाही तर संसर्गाचा धोका वाढण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात शनिवारी सुमारे 232 कोरोना चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये 14 कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्या तुलनेत गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी होत आहे.

जिल्ह्यात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यानंतरही कोरोनाबाधितांची संख्या घटल्याने संसर्ग रोखण्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला यश आले आहे. दिवसभरात 3 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. गेल्या चार महिन्यातील हा सर्वात निचांकी आकडा आहे. यामध्ये आरटीपीसीआरमध्ये 2 तर ऍन्टिजेनमध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व बाधित रत्नागिरी तालुक्‍यातील आहेत. उर्वरित आठ तालुक्‍यांमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही. 

गेल्या चोवीस तासात 27 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 8 हजार 145 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बरे होण्याचे प्रमाण 94.74 टक्के झाले आहे. आज एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. परंतु आतापर्यंत 319 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 3.71 टक्‍केवर स्थिर आहे तर 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकूण 50 हजार 896 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील विविध 11 कोविड रुग्णालयात 67 रुग्ण उपचार घेत आहेत. 

दृष्टिक्षेपात... 

  • एकूण बाधित 8,597 
  • एकूण निगेटिव्ह 50,896 
  • बरे झालेले 8,145 
  • एकूण मृत्यू 319 
  • उपचाराखालील 67 
     

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk Of Corona Infection By Tourist Crowd In Konkan