वेंगुर्लेत गणेशोत्सवात रस्त्यावरील बाजार बंद 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

गणेशोत्सव कालावधीत ज्यांना दुकाने लावायची आहेत, त्या किरकोळ व्यापाऱ्यांनी 10 ऑगस्टपूर्वी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे महत्त्वपूर्ण निर्णय गणेशोत्सव नियोजन बैठकीत घेण्यात आले. 

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - गणेश चतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षी रस्त्यावर बाजार भरविला जातो; परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही व्यापाऱ्याला रस्त्यावर विक्री करता येणार नाही; मात्र 20 व 21 ऑगस्टला गाडीअड्डा ते सारस्वत बॅंकपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने फक्त माटवीच्या सामानाची विक्री करण्यासाठी मुभा दिली आहे.

गणेशोत्सव कालावधीत ज्यांना दुकाने लावायची आहेत, त्या किरकोळ व्यापाऱ्यांनी 10 ऑगस्टपूर्वी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे महत्त्वपूर्ण निर्णय गणेशोत्सव नियोजन बैठकीत घेण्यात आले. 

गणेशोत्सव नियोजनाची शहराची सभा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार, पोलिस निरीक्षक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, वीज वितरणचे प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी, रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कोरोना रोगाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

शहरात इतरत्र कुठेही व्यापार करायची मुभा राहणार नाही. संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत 20 ते 27 ऑगस्टपर्यंत मारुती स्टॉप ते दाभोली नाका हा रस्ता चारचाकी व जड वाहनांसाठी बंद राहणार आहे. दाभोली नाका ते सारस्वत बॅंक, तसेच हॉस्टिपल नाका ते गाडीअड्डा नाकापर्यंत रिक्षा व्यावसायिकांनी दरवर्षीप्रमाणे वाहने नियमाप्रमाणे लावून वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मच्छी विक्रेत्यांनी गणेशोत्सव कालावधीत मानसी गार्डनसमोरील नियोजित केलेल्या ठिकाणी व्यवसाय करावा, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. गणेशोत्सव कालावधीमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याकरिता केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले. 

भाजी विक्रेत्यांना नोंदणीची अट 

गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत लावण्यात येणारी दुकाने ही 18 ऑगस्टपासून किमान तीन फुटांच्या अंतरावर लावण्यात येतील. भाजी, फळे, फुले, अगरबत्ती वगैरेंची दुकाने रस्त्यावर न लावता नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे काम चालू आहे, त्या ठिकाणी दुकाने लावावयाची आहेत. भाजी विक्रेत्यांनी नगरपरिषद भाजी मार्केटमध्ये नियोजित केलेल्या जागेतच व्यवसाय करावयाचा आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे 10 ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी. विहित मुदतीत नावे न देणाऱ्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेली जागा संपल्यानंतर जागा दिली जाणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Side Market In Vengurle Close In Ganesoushav Period