घर गाठण्यासाठी रोज कंबरभर पाण्यातून प्रवास

महेश बापर्डेकर
Tuesday, 12 January 2021

तीन कुटुंबासाठी घरापर्यंत जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था झाली नसल्याचे त्या कुटंबप्रमुखांनी कोणतीही पूर्वसुचना न देता येणाऱ्या 26 जानेवारीस ग्रामपंचायतसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. 

आचरा (सिंधुदुर्ग) - वायंगणी (ता.मालवण) गावातील मंडारवाडी दांडवळ येथे राहणाऱ्या तीन कुटुंबाना मुख्य रस्त्यापासून आपल्या घर गाठण्यासाठी बारमाही चक्क कंबरभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. आजारी व्यक्तींना उपचार करण्यासाठी खांद्यावर बसवून न्यावे लागत आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे, ग्रामपंचायतीचे लक्ष वेधूनही या तीन कुटुंबासाठी घरापर्यंत जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था झाली नसल्याचे त्या कुटंबप्रमुखांनी कोणतीही पूर्वसुचना न देता येणाऱ्या 26 जानेवारीस ग्रामपंचायतसमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. 

वायंगणी भंडारवाडी दांडवळ येथील भागात किरण पेडणेकर, सचिन पेडणेकर, गोपाळ पेडणेकर या तीन कुटुंबाची घरे व मुख्य रस्ता यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. हे पाणी जून ते डिसेंबर या 8 महिन्याच्या कालावधीत कंबरभर असते. पावसाळ्याच्या चार महिन्यात या कुटंबियांना या पाण्यातूनच ये-जा करावी लागतेच; पण उन्हाळ्यातही पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. शेजारील गावातील लोक शेतीसाठी लागणारे पाणी बंधारा घालून अडवत असल्याने पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यातही या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो.

घरात एखादी व्यक्‍ती आजारी असल्यास डॉक्‍टर घरी येणे शक्‍य नसल्याने त्या व्यक्तीला खांद्यावर उचलून घेवून मुख्य रस्ता गाठावा लागतो, असे पेडणेकर सांगतात. बाराही महिने ये-जा करण्याच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने या कुटुंबांना रोज पाण्यातूनच जीव धोक्‍यात घालून ये-जा करावी लागत आहे. वाडीच्या स्मशानभूमीकडे जाण्याचा हाच मार्ग असल्याने एखाद्याचे निधन झाल्यास अंत्यसस्कार करण्यासाठी वाडीतील काही घरांना कंबरभर पाण्यातून स्मशानभूमी गाठावी लागते. 

बाजूच्या गावात शेती करताना पाणी अडवले जात असल्याने ये-जा करण्याचा मार्ग पुर्णत: पाण्याखाली जात असल्याने वाटेवर साठणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी या कुटुंबीयांनी नोव्हेंबरमध्ये वायंगणी ग्रामपंचायतकडे केली असल्याचे पेडणेकर यांनी सांगत जानेवारी उजाडला तरी दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे कोणतीही उपाययोजना न केल्याने आमचे कुटुंब कोणतीही पुर्वसुचना न देता 26 जानेवारीला ग्रामपंचायतसमोर सुरक्षित वाटेसाठी उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतीसाठी पाणी अडवल्याने समस्या 
- साठणाऱ्या पाण्याचे नियोजनच नाही 
- तक्रारी करूनही प्रशासनाचा कानाडोळा 
- आजारी व्यक्तींना इतरांच्या खांद्याचा आधार 
- रोज जीव मुठीत धरून प्रवास 
- ऐन पावसाळ्यात स्थिती बिकट 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road water facility problems vayangani konkan sindhudurg