esakal | कुडाळ, मालवणात रस्त्यांच्या कामांना होणार सुरवात : वैभव नाईक
sakal

बोलून बातमी शोधा

वैभव नाईक

कुडाळ, मालवणात रस्त्यांच्या कामांना होणार सुरवात : वैभव नाईक

sakal_logo
By
प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण : कुडाळ, मालवण तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. यामुळे नागरिकांना, वाहनचालकांना त्रास होत आहे. मतदार संघातील कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना यापूर्वीच मंजुरी मिळाली असून कार्यारंभ आदेशही देण्यात आला; मात्र कोरोनामुळे तसेच लवकर सुरू झालेल्या पावसामुळे ही कामे रखडली. लोकप्रतिनिधी म्हणून ही कामे करण्याची माझी जबाबदारी असून ही सर्व कामे येत्या दसर्‍यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

माझ्यावर टीका करून रस्त्यांची दुरूस्ती होणार नाही. त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ते खुशाल करावे. दर्जेदार रस्त्यांची कामे होण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: UPSCचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल; 761 जणांची नियुक्ती

येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, पंकज सादये, सेजल परब, सन्मेश परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, ``कुडाळ, मालवण तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामांवरून राजकीय आरोपही केले जात आहेत. दोन्ही तालुक्यातील रस्त्यांना काही महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली असून त्यांना कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे; मात्र कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव तसेच पावसाळा लवकर सुरू झाल्याने ही कामे रखडली. ही वस्तुस्थिती आपण नाकारत नाही. आता कोरोनाची राज्यातील परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे येत्या दसर्‍यानंतर दोन्ही तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्षात सुरवात करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जी विविध विकासकामे झाली त्यात ठेकेदारांचे सुमारे 100 कोटी रुपयांची बिले अडकली आहेत. हा निधी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून येत्या महिनाभरात हा निधी उपलब्ध होईल. मतदार संघातील रस्त्यांची कामे मार्गी लावणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे या रस्त्यांची दर्जेदार कामे करण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत.``

loading image
go to top