चिपळुणात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

याबाबत चिपळूण पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार गोवळकोट रोड परिसरातील सफा अपार्टमेंट या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर अफसाना मिर्जा माहिमकर यांचा फ्लॅट आहे. हे कुटुंब मंगळवारी मूळ गावी गुहागर येथे गेले होते.

चिपळूण (रत्नागिरी) - खेड पाठोपाठ चोरट्यांनी थेट चिपळूणमध्ये डल्ला मारला आहे. शहरातील गोवळकोट रोड परिसरातील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत चोरीचा पंचनामा केला असून चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. गजबजल्या परिसरात चोरी झाल्याने पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत चिपळूण पोलीसातून मिळालेल्या माहितीनुसार गोवळकोट रोड परिसरातील सफा अपार्टमेंट या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर अफसाना मिर्जा माहिमकर यांचा फ्लॅट आहे. हे कुटुंब मंगळवारी मूळ गावी गुहागर येथे गेले होते. त्यामुळे त्यांचा फ्लॅट बंद होता. ही संधी साधत गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्याने दर्शनी दरवाज्याची कडी तोडून थेट बेडरूममध्ये प्रवेश केला. येथील स्टीलचे कपाट उघडून त्यातील 3 हजार रुपये तसेच चांदी चोरली. 

या परिसरातील आफ्रिन पॅलेस या बिल्डिंगमध्येदेखील चोरट्यांनी डल्ला मारला. येथील नौसीन निजाम पटाईत यांचा बंद फ्लॅटदेखील चोरट्याने अशाच प्रकारे फोडला.येथून सोन्याच्या दागिन्यासह एकूण 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. पटाईत कुटुंब खेडमध्ये असतात त्यामुळे त्यांचा येथील फ्लॅट हा बंद होता. चोरीची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पंचनामा देखील केला.दोन्ही फ्लॅट बंद असल्याची माहिती असल्यानेच चोरट्यानी येथे डल्ला मारला त्यामुळे चोरटे हे माहितगार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

दोन्ही चोऱ्यामध्ये काय साम्य 
बुधवारी (18) रात्री खेड येथे चोरट्याने घरफोडी केली तर गुरुवारी रात्री गोवळकोटसारख्या गजबजलेल्या परिसरात फ्लॅट फोडले. या दोन्ही चोऱ्यामध्ये काय साम्य आहे का, तसेच चिपळूणमध्ये सतत चोरीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी चौहोबाजूने तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊन संपताच चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांसमोर देखील मोठे आव्हान उभे राहिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery Incidence In Two Flats In Chiplun