रा. स्व. संघाचे विभागसंचालक पांडुरंग वैद्य यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

रत्नागिरी, ठाणे, कुलाबा या जिल्ह्यातील आयकर व टॅक्‍सची कामे अलिबागमधून चालत. रत्नागिरीत 1950 ला आयकर खात्याचे कार्यालय सुरू झाले. त्यावेळच्या क्षेत्राने विस्तीर्ण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आयकर व टॅक्‍सच्या अनेक ग्राहकांना सेवा देता यावी

रत्नागिरी - ज्येष्ठ करसल्लागार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संचालक पांडुरंग जगन्नाथ तथा बाळासाहेब वैद्य (वय 93) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (ता. 31) सकाळी निधन झाले. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत ते संघाचे काम करत होते. त्यांच्यावर सायंकाळी भागोजीशेठ कीर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गेले 6 दिवस ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना काका नावानेही संबोधले जायचे. बीकॉम झालेल्या काकांनी मेहुणे ऍड. वसंतराव पटवर्धन यांच्याकडे ठाण्यात टॅक्‍स प्रॅक्‍टिशनर म्हणून सुरवातीला नोकरी केली. त्या काळी रत्नागिरी, ठाणे, कुलाबा या जिल्ह्यातील आयकर व टॅक्‍सची कामे अलिबागमधून चालत. रत्नागिरीत 1950 ला आयकर खात्याचे कार्यालय सुरू झाले. त्यावेळच्या क्षेत्राने विस्तीर्ण असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आयकर व टॅक्‍सच्या अनेक ग्राहकांना सेवा देता यावी म्हणून पटवर्धन यांच्या सल्ल्याने काकांनी रत्नागिरीत प्रॅक्‍टिस सुरू केली. येथे एवढा चांगला जम बसवला आणि पटवर्धन यांनी 1970 पासून मुभा देऊन व्यवसाय वाढवण्यास सांगितले. 

काका हे पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. करसल्लागार असले तरी नियमित शाखेत जाणे, कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी ते घेत. यामुळेच त्यांना जिल्हा कार्यवाह, जिल्हा संघचालक, विभाग संघचालक अशा विविध पदांवर काम करून त्यांना न्याय दिला. हेडगेवार स्मारक न्यासाचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले. 80 व्या वयापर्यंत काकांनी संघाचे काम सुरू ठेवले. 

आणीबाणीमध्ये 1975 ला मिसाखाली काकांना 18 महिने येरवडा तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला. या काळात पत्नी प्रमिला यांनी टॅक्‍स प्रॅक्‍टीस खंबीरपणे चालवली. सामाजिक कार्यात असूनही काकांना संगीताची खूप आवड होती. संघाच्या गीतांबरोबरच भाव, नाट्यगीत ते गायचे. बुद्धिबळ हा त्यांचा आवडीचा खेळ होता. त्यांच्या पश्‍चात मुलगे सीए श्रीकांत व सीए श्रीरंग, मुलगी ऍड. वर्षा, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

शिस्तप्रिय कार्यपद्धती 

मनमोकळा स्वभाव, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि समाजभिमुख दृष्टीकोनामुळे काकांच्या व्यक्तिमत्वाला आयाम प्राप्त झाला होता. स्व. मनोहर पर्रीकर व श्रीपाद नाईक हे संघ स्वयंसेवक त्यांच्या मुशीत घडले. संघ त्यांची जीवननिष्ठा होती. सामान्य स्वयंसेवकाला त्यांच्या वडिलकीचा शब्द आश्वासक वाटे. माजी आमदार कुसुमताई अभ्यंकरांच्या लाल बंगली पुस्तकाच्या मुंबईतील प्रकाशनानिमित्त एकत्र प्रवास केला. एका खिशात चॉकलेट, दुसऱ्या खिशात ड्रायफ्रूट असल्यामुळे प्रवासात चंगळ व गप्पांच्या मैफिलीमुळे आनंद होता. 

- ऍड. विलास पाटणे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Regional Director Pandurang Vaidya No More Ratnagiri Marathi News