'एस. टी. कामगारांना महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी'

मकरंद पटवर्धन
Tuesday, 13 October 2020

शासनाने कर्मचार्‍यांना जुलै 2019 पासून जाहीर झालेला वाढीव 5 टक्के महागाई भत्ता डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 च्या वेतनापासून लागू केला आहे.

रत्नागिरी - कामगार कराराच्या तरतुदीनुसार कामगारांना उत्सव अग्रिम व महागाई भत्त्याची थकबाकी दिवाळी सणापूर्वी मिळण्याबाबत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे, या संदर्भात अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी माहिती दिली.
 

दिवाळी 13 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ही मागणी संघटनेने केली आहे. शासनाप्रमाणे रा. प. कामगारांना उत्सव अग्रिम व महागाई भत्ता अदा करण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. त्यानुसार शासनाने वर्ग 3 व 4 पदावरील सर्व कर्मचार्‍यांना दरवर्षी सणाच्यावेळी 12 हजार 500 रुपये उत्सव अग्रिम देण्याचे मान्य केले आहे. उत्सव अग्रिमची समान 10 हप्त्यात 1250 रुपयांप्रमाणे वसुली करण्याचेही मान्य केले आहे. डिसेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 पर्यंतची थकबाकी दिवाळीपूर्वी कामगारांना देण्यात यावी. जुलै 2018 ते सप्टेंबर 2018 या तीन महिन्यांच्या कालावधीची वाढीव 2 टक्के महागाई भत्त्याची थकबाकी व जानेवारी 2019 ते सप्टेंबर 2019 या 9 महिन्यांच्या कालावधीची वाढीव 3 टक्के महागाई भत्त्याची थकबाकी रा. प. कामगारांना अद्याप मिळालेली नाही. या संबंधात 26 नोव्हेंबर 2019 ला राज्यपातळीवर झालेल्या संयुक्त विचारविनिमय बैठकीमध्ये चर्चा होऊन महागाई भत्त्याच्या मुद्द्यावर वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचेही मान्य करण्यात आले होते. परंतु या संबंधात अद्याप निर्णय झालेला नाही. तो निर्णय त्वरित घेण्याची मागणीही केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हे पण वाचाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रउत्सव होणार साध्या पध्दतीने

वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबरपासून द्यावा

शासनाने कर्मचार्‍यांना जुलै 2019 पासून जाहीर झालेला वाढीव 5 टक्के महागाई भत्ता डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 च्या वेतनापासून लागू केला आहे. परंतु कामगार कराराची तरतूद असतानाही रा. प. कामगारांना वाढीव 5 टक्के महागाई भत्ता अद्याप लागू केलेला नाही. 5 टक्के वाढीव महागाई भत्ता माहे. ऑक्टोबर 2020 च्या वेतनापासून लागू करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S T workers arrears of dearness allowance should be paid to the before Diwali