शिवसेनेचा रत्नागिरीतील शिक्षण सभापती राष्ट्रवादीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - शिवसेनेचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी सोमवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. सभापतीपदासह जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्याकडे सादर केला. ते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता असून गुहागरमधून भास्कर जाधवांविरोधात रिंगणात उतरतील. 

गुहागर मतदारसंघात सहदेव बेटकर यांना काम करण्याचे आदेश शिवसेनेकडून वर्षभरापूर्वी देण्यात आले होते. बेटकर यांनी गुहागर मतदारसंघ पिंजून काढला. पक्षवाढीसह बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची मोट बांधली . परंतु, भास्कर जाधव यांनी सेना प्रवेश केल्यामुळे बेटकर यांना काम थांबवण्याचे आदेश आले. त्यामुळे ते नाराज झाले होते. उमेदवारी द्यायची नव्हती, मग स्वप्न दाखवायची कशाला असा प्रश्‍न त्यांनी व्यथित होऊन विचारला.

कुणबी समाज संघटनेचे काम करणाऱ्या बेटकरना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत होता. सेनेतून डावलण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या हालचाली सुुरु केल्या. शिवस्वराज्य यात्रेवेळी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत ते पोचले . त्यांना राष्ट्रवादीने निमंत्रण दिले होते. सोमवारी (ता. 30) जिल्हा परिषद विशेष सभेसाठी ते उपस्थित होते.

सायंकाळी बेटकर यांनी घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचे नमुद केले. यावेळी अध्यक्षासह आमदार उदय सामंत, संतोष थेराडे यांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते आपल्या निर्णयावर ठाम होते. शिवसेना-भाजपकडे इनकमिंग सुरु असतानाच उमेदवारीसाठी सत्ताधारी पक्षाला जय महाराष्ट्र करणारे बेटकर पहिलेच ठरले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष लागले आहे. 

लोकांच्या आग्रहास्तव मी निर्णय घेतला आहे. गेले काही दिवस याबाबत मनाची तयारी करत होतो. आतापर्यंत पदावर असताना जनतेची सेवा करत आलो आहे. 

- सहदेव बेटकर, शिक्षण सभापती 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahadev Betkar leaves shivsena and will enter in NCP