'विरोधकांनी भाजपचा धसका घेतलाय ; विकास केल्यानेच माझी बदनामी'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

गेल्या चार वर्षात आम्ही कोट्यवधी रुपयाची विकासकामे केली. ती विकासकामे आज जनतेला दिसत आहेत.

चिपळूण (रत्नागिरी) : चार वर्षांत केलेली विकासकामे जनतेला दिसत आहेत. विरोधकांनी भाजपचा धसका घेतला आहे म्हणून माझी बदनामी केली जात आहे, असे स्पष्टीकरण नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी संपर्क अभियानाच्या दरम्यान नागरिकांना दिले. मी चार वर्षांत कामे केली म्हणून जनतेसमोर आले. महाविकास आघाडीतील नगरसेवक कोणत्या तोंडाने जनतेसमोर जातील, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

नगराध्यक्षा खेराडेंवर महाविकास आघाडीकडून विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. त्यावर नागरिकांना केलेल्या कामाची माहिती व्हावी, यासाठी नगराध्यक्षांनी शहरात संपर्क अभियान सुरू केले आहे. प्रभाग क्र. २ मध्ये भैरी मंदिर येथे नगराध्यक्षांनी तेथील नागरिकांची बैठक घेऊन शहरात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी महाविकास आघाडीकडून होणाऱ्या आरोपांबाबत नागरिकांनी नगराध्यक्षांकडे चौकशी केली तेव्हा नगराध्यक्षांनी त्याचे स्पष्टीकरण दिले.

हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात -

नगराध्यक्षा म्हणाल्या, ‘‘गेल्या चार वर्षात आम्ही कोट्यवधी रुपयाची विकासकामे केली. ती विकासकामे आज जनतेला दिसत आहेत. मला सर्वच प्रभागातील लोकांनी मतदान केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेद न करता सर्वच लोकांना मूलभूत सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला. काही नगरसेवकांनी विकासकामांच्या याद्याही दिल्या नाहीत तरीही त्यांच्या प्रभागात कोट्यवधीची कामे केली. नगराध्यक्षपदावर बसल्यानंतर पहिल्या दिवसापासून मला त्रास सुरू आहेच. पण मी त्या त्रासाला सामोरे जाऊन नागरिकांची कामे केली.

पालिका निवडणूक जवळ आली आहे. मी केलेली कामे जनतेसमोर आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढेल, या धास्तीने विरोधक एकवटले आहेत. त्यांनी बदनामीची मोहीम सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील नगरसेवक प्रभागातील कामे करण्यास विरोध करत आहेत.’’ यावेळी  आशिष खातू, रसिका दांडेकर, विजय चितळे, नुपूर बाचिम आदी उपस्थित होते.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: said in meeting mrs. kherade critiseid on rashtravadi congress party in ratnagiri