Sakal Impact : इंटरनेट सेवेअभावी ‘बीएसएनएल’ला फर्मान

राजेंद्र बाईत
Wednesday, 4 November 2020

त्यामुळे साखरकोंबे गावासह तेथील विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

राजापूर (रत्नागिरी) : इंटरनेट सेवेअभावी साखरकोंबे येथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या खेळखंडोब्याबाबत ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीची दखल घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर ऋषीकेश पळसदेवकर यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने इंटरनेट सेवेचा प्रश्‍न तातडीने सोडविण्याच्या सूचना ‘बीएसएनएल’ कार्यालयाला केल्या आहेत. त्यामुळे साखरकोंबे गावासह तेथील विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - जुनेच दिग्गज मैदानात ; आता शिवसेना होणार आक्रमक -

साखर येथील सुमारे तीनशे-साडतीनशे लोकवस्ती कोंबे या खोलगट भागामध्ये वसलेली आहे. साखर परिसरामध्ये बीएसएनएल वा जिओ वा अन्य अन्य कंपन्यांच्या रेंजसह इंरनेटची रेंज येते. मात्र, कोंबेच्या लोकवस्तीमध्ये इंटरनेट नाही, मोबाईलची रेंज येत नाही. दरम्यान, कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते पळसदेवकर यांनी साखरकोंबे येथील मुलांच्या इंटरनेट सुविधेचा प्रश्‍न सुटण्यासाठी शासनाच्या वेबसाइटद्वारे थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला.

ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेट मिळविण्यासाठी साखरकोंबेच्या विद्यार्थ्यांची सुरू असलेली पायपीट आणि कसरत मांडून केंद्र शासनाच्या भारत कनेक्‍ट योजनेतून साखरकोंबेच्या इंटरनेट सुविधेचा प्रश्‍न सोडविण्यास शासनाला सूचित केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने तातडीने दखल घेत पुढील कार्यवाही करण्याची सूचना बीएसएनएल विभागाला केली. त्यांच्या प्रयत्नामुळे साखरकोंबे गावासह तेथील मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचा प्रश्‍न सुटण्याला चालना मिळाली.

हेही वाचा -  अजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

काय होती समस्या

लॉकडाउनच्या काळात मुलांना ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या साऱ्यामध्ये ऑनलाइन शिक्षणासाठी साखरकोंबे येथील मुले सुमारे एक कि. मी. पायपीट करून डोंगरावर पालकांनी बांधून दिलेल्या मचाणावर अभ्यास करीत आहेत. या वृत्तानंतर समाजामधून विविध प्रतिक्रिया उमटत होत्या.

"साखरकोंबे येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सोडविण्यासाठी शासनाच्या वेबसाइटद्वारे पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला. भारत कनेक्‍ट योजनेद्वारे गावे एकमेकांना इंटरनेट सुविधेने जोडण्याचे काम सुरू आहे. ती योजना साखरकोंबे येथे राबविल्यास त्या मुलांचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. यावर पंतप्रधान कार्यालयाने कार्यवाही केली आहे."

- ऋषीकेश पळसदेवकर, सॉफ्टवेअर इंजिनिअर

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal impact on konkan area online study edict for BSNL in ratnagiri