esakal | शिरोड्याची ऐतिहासिक ओळख सांगणारी मिठागरे अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

shiroda

मजुरी परवडेना; बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देणे बनले अवघड

शिरोड्याची ऐतिहासिक ओळख सांगणारी मिठागरे अडचणीत

sakal_logo
By
दिपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गातील (Sindhudurg) एकमेव मिठागर असलेल्या शिरोड्यात (Shiroda) मीठ व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे. कामगारांची मजुरी परवडणारी नसल्याने मीठ जास्त किमतीने विकावे लागते; मात्र इतर भागातून स्वस्त मीठ उपलब्ध होत असल्याने मार्केट मिळवणे व्यावसायिकांना अवघड बनले आहे.

हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माड-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव म्हणजे शिरोडा. तेथील लांबच लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र वाळूची सुंदर, रम्य चौपाटी पर्यटकांना भुरळ पाडते; मात्र शिरोड्याची खरी ओळख म्हणजे तेथील मिठागरे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्व या मिठागरामुळेच निर्माण झाले. १९३० मध्ये शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे आजही येथील ओळख सर्वदूर पसरली आहे. इतिहासाची पाने चाळली असता १२ मार्च १९३० ही मिठाच्या सत्याग्रहाची तारीख ऐकल्यावर शिरोडा मिठागराची आठवण होते. महात्मा गांधींच्या मीठ सत्याग्रहाचे आंदोलन या मिठागरावरही झाले होते. हजारो मीठ सत्याग्रहींना लाठ्या खाव्या लागल्या होत्या. त्यावेळच्या स्मृती आजही जिवंत आहेत. कारण शिरोडावासीयांनी त्या मिठागरांवरील मीठ उत्पादन आजही सुरू ठेवले आहे.

सिंधुदुर्गात पूर्वी मालवण, मिठबाव आदी भागात उत्पादन व्हायचे. आज तेथील मिठागरे बंद पडली आहेत. शिरोडा या एकमेव गावात सध्या मीठ बनविले जाते. गांधीनगर भागातील सुमारे ८७ एकर क्षेत्रात मीठ तयार होते. या भागात देवी माऊली देवस्थान, गणेशप्रसाद, भास्कर, नारायण प्रसाद, मोरो भीमाजी, सकबा सबनीस अशी सहा खाजगी मिठागरे आहे. नवारदेसाई, दादासाहेब, जुनादेसाई, दुर्गाबाई, सातोराम, विठोजी रामाचा, वडाचा मिठागर (ज्या ठिकाणी १९३० मध्ये मीठ सत्याग्रह झाला होता.) अशी पाच केंद्र सरकारच्या मालकीच्या क्षेत्रातील मिळून एकूण अकरा मिठागरांमध्ये मीठ बनविले जाते. मीठ तयार होण्यास फेब्रुवारी मध्यापासून सुरुवात होते. या हंगामात मे अखेरपर्यंत चालतो. वर्षाकाठी सुमारे अडीच हजार टन मीठ उत्पादन होते. या मिठागरांमधून पांढरे व काळे असे दोन प्रकारचे मीठ तयार केले जाते. काळे मीठ हे प्रामुख्याने आंबा कलमे, नारळीच्या झाडांना खतासाठी वापरले जाते.

शिरोडा येथील मिठागरांमध्ये चौदा आगर आहेत; मात्र दरवर्षी एक-एक आगर बंद ठेवला जात आहे. यावर्षी फक्त ६ ते ७ आगारांवर मीठ उत्पादन घेतले जात आहे. या मिठागरांवर नोव्हेंबरपासून मीठ उत्पादनाच्या कामास हळूहळू सुरुवात होते आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रत्यक्ष मीठ उत्पादित होते. यासाठी कामगारांची गरज असते. सद्यस्थितीत कामगारांची समस्या मीठ उत्पादकांना भेडसावत आहे. मिठामध्येही दोन प्रकार असतात, एक बारीक मीठ व एक काळे जाडे मीठ. मिठागरात एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के जाडे मीठ उत्पादित होते; मात्र सध्याच्या वाढत्या महागाईत उत्पादित मीठ व विक्री झालेल्या मिठाची आर्थिकदृष्टया सांगड बसणे मुश्कील झाले आहे.

दर मिळणे आवश्‍यक

सध्या या मिठागरामध्ये काम करण्यासाठी कुशल कामगार मिळणे अवघड बनले आहे. कामगारांची मजुरीही जास्त आहे. यामुळे उत्पादीत मिठाला जास्त दर मिळणे आवश्यक असते. या तुलनेत रत्नागिरी व इतर भागातील मिठागरांमध्ये कामगारांवरील खर्च कमी आहे. त्यामुळे कमी दरात मिठ देणे त्यांना परवडते. हे मीठ जिल्ह्यातही उपलब्ध होते. त्या तुलनेत शिरोड्याचे मीठ महाग पडते. त्यामुळे हा व्यवसायच गेले काही दिवस अडचणीत आला आहे. याला शासनाकडून हातभार लागण्याची गरज आहे. तसे न केल्यास शिरोड्याची ऐतिहासिक ओळख सांगणारी ही मिठागरे इतिहासाच्या पानातच राहण्याची भीती आहे. शासनाने येथे आयोडाइड प्लॅन्ट उभारून त्याद्वारे या उत्पादित मिठावर प्रक्रिया करून ते मीठ बाजारात आणल्यास मिठालाही चांगला दर मिळेल.

या आहेत मिठागराच्या आठवणी

शिरोड्यात मिठाचा सत्याग्रह झाला. १९३० मध्ये महात्मा गांधीजीच्या आदेशानुसार भारतभर मिठाचा सत्याग्रह झाला. या मिठाच्या सत्याग्रहाचे एक आंदोलन शिरोडा येथे घडले. शिरोड्यातील मंदिरात एकत्र जमून नंतर मिठाचा सत्याग्रह मिठागरे आहेत तेथे करण्यात आला. आजही वटवृक्षाचे झाड त्याची आठवण देत आहे. या वडाच्या झाडाकडे लक्ष दिल्यावर मिठाच्या सत्याग्रहाची आठवण होते.

मिठावर आधारित उद्योग सुरू होणे गरजेचे असून शासनाने मीठ उत्पादकांना मार्केट मिळवून दिले पाहिजे. ज्याप्रमाणे शेतकरी, मच्छिमार यांना ज्याप्रमाणे शासन योजना देते त्याप्रमाणे मीठ उत्पादकांसाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मिठावर आधारित एखादा प्रक्रिया प्रकल्प यासाठी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

- मनोज उगवेकर, सरपंच, शिरोडा

पॉईंटर

शिरोडा मिठाघरावर एक नजर

- १९३०च्या ऐतिहासिक सत्याग्रहामुळे सर्वदूर ओळख

- आंदोलनाच्या स्मृती आजही ताज्या

- मिठागरांमध्ये चौदा आगर

- आर्थिकदृष्टया सांगड बसणे मुश्कील

- कुशल कामगार मिळणे अवघड

- आयोडाइड प्लॅन्ट उभारण्याची गरज

loading image
go to top