esakal | सॅल्युट ! कनिका रावराणे लेफ्टनंट 
sakal

बोलून बातमी शोधा

Salute To Kavita Raorane Who Become Lieutenant

मेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट 2018 मध्ये काश्‍मिरमधील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. ज्यावेळी ते शहीद झाले त्यावेळी त्यांव्या मुलाचे वय अवघे दोन वर्ष होते

सॅल्युट ! कनिका रावराणे लेफ्टनंट 

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या पत्नी कनिका रावराणे या लेफ्टनंट झाल्या आहेत. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण त्यांनी पुर्ण केले आहे. 

मेजर कौस्तुभ रावराणे हे ऑगस्ट 2018 मध्ये काश्‍मिरमधील गुरेज सेक्‍टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. ज्यावेळी ते शहीद झाले त्यावेळी त्यांव्या मुलाचे वय अवघे दोन वर्ष होते. त्यांची पत्नी कनिका ही मुंबईत एका ठिकाणी नोकरीला होती; परंतु मुलगा लहान असताना देखील सैन्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्या सैन्याची परिक्षा चांगल्या गुणवत्तेने पास झाल्या. मुलाखतीत देखील त्या अग्रेसर होत्या. दरम्यान, गेले नऊ महिने त्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेत होत्या. प्रशिक्षणाचा हा खडतर टप्पा त्यांनी यशस्वीपणे पार पाडीत आता त्या लेफ्टनंट झाल्या आहेत. 

कौस्तुभ रावराणे यांचे मुळ गाव सडुरे (ता. वैभववाडी) हे आहे. त्यांचे बालपण, शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. एक एक टप्पा यशस्वीपणे पार करीत ते सैन्यात मेजर पदापर्यत पोहोचले. ज्यावेळी कौस्तुभ रावराणे हे शहीद झाले त्यावेळी संपुर्ण तालुक्‍यावर शोककळा पसरली होती. त्यांचा अस्थिकलश तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये दर्शनासाठी आणण्यात आला होता. दरम्यान, आता त्यांच्या पत्नी कनिका यांनी कठिण परिस्थितीतुन बाहेर पडत त्या सैन्यात लेफ्टनंटपदी रूजु झाल्यामुळे त्यांच्यावर तालुक्‍यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


"" देशासाठी लढताना आमचा कौस्तुभ शहीद झाला. त्यावेळी कुटुंब अक्षरक्षः कोलमडुन पडले होते; परंतु देशासाठी शहीद होणे ही बाब अभिमानास्पद असली तरी कुटुंबाला त्यातुन सावरताना खुप वेळ जात असतो. तरीदेखील कौस्तुभची पत्नी कनिका ही दोन वर्षाचा मुलगा असताना देखील तिने सैन्यात जाण्याचा घेतलेला निर्णय आमच्यासाठी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. गेली दीड दोन वर्ष ती या सर्व प्रक्रियेतुन जात होती. आता ती लेफ्टनंट झाली याचा आम्हाला खरोखरच आनंद आहे.'' 
- विजय रावराणे, कौस्तुभचे काका, (सडुरे, ता. वैभववाडी) 
 

 
 

loading image