'पन्हळे धरणातील पाणीसाठा कमी करणार' ; गळती थांबविणे सध्या अशक्‍य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लांजा (रत्नागिरी) : पन्हळे धरणाला लागलेली गळती थांबविणे सध्यातरी शक्‍य नसल्याने धरणातील पाणीसाठा कमी करणे, हाच त्यावरील उपाय असल्याने याबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

लांजा तालुक्‍यातील पन्हळे येथील लघुपाटबंधारे विभागाच्या धरणाच्या सांडव्याला सोमवारपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली असून, त्यामुळे पन्हळे धरणक्षेत्राखाली असलेल्या पाच ते सहा गावांमध्ये धरणफुटीच्या भीतीने घबराट निर्माण झाली होती. मंगळवारी याबाबत लांजा तहसीलदार पोपट ओमासे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता एस. व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी संयुक्तपणे पाहणी केली होती. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांनी धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी दुपारी पन्हळे धरणाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्‍यक ती माहिती घेऊन सूचना दिल्या आहेत. स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सद्यःस्थितीत काय उपाययोजना करता येईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या भेटीप्रसंगी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जया माने, उद्योजक किरण सामंत, संदीप दळवी, लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, एस. व्ही. नलावडे, मंगेश शिंदे, पोपट ओमासे आदीं उपस्थित होते.

पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने..

पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने धरणाला लागलेली गळती थांबविणे सध्या तरी अशक्‍य असल्याने धरणातील पाणीसाठा कमी करणे, हा एकमेव उपाय असल्याने याबाबत अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या.

अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश

पन्हळे धरणाच्या दुरुस्तीच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून सांडवा दुरुस्ती, विहीर बांधणी, कालव्याचे रखडलेले काम पूर्ण करणे अशी कामे करणार असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून दिली. इतर कालव्यासंदर्भात कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sam of panhale in lanja kokan area water supply decreases in lanja vinayak raut said in yesterday