सिंधुदुर्गात प्रथमच 'या' प्राण्याच्या कळपाचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पट्टेरी वाघ, बिबट्या, गवेरेडे, रान डुक्कर, नदीतील मगरी यांच्याकडून गुरांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना ताज्याच आहेत; परंतु एखाद्या सांबराच्या कळपाकडून गुरांवर हल्ला करून त्याला जायबंदी केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच व दुर्मिळ घटना असेल.

ओटवणे ( सिंधुदुर्ग )  -  मांडवफातरवाडी येथील वसंत सुरेश कवठणकर यांच्या मालकीच्या बैलाला सांबराच्या कळपाने जोरदार हल्ला करून जखमी केले. यात बैलाच्या मागील डाव्या पायाचे हाड तुटल्याने पाय पूर्णतः निकामी झाला. त्यामुळे शेतकरी कवठणकर यांचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गुरे जखमी किंवा भक्ष्यस्थानी पडणे या घटना वस्तीभागात देखील आता सर्रास होताना दिसतात. दरम्यान, मांडवफातरवाडी नमशी भागात सकाळी शेतकरी कवठणकर यांनी चरण्यासाठी गुरे सोडली होती. जंगल परिसरातून अचानक भात शेतीकडे वळलेल्या चार सांबराच्या कळपाने चरत असलेल्या बैलावर जोरदार हल्ला केला. हे पाहून भातशेतीत असलेले वसंत कवठणकर त्याठिकाणी धावून गेले. परंतु सांबरचा कळपाने अचानक कवठणकरांच्या बाजूने हल्ला केल्याने ते घाबरून खाली पडले. याचवेळी साबराचा कळप त्यांना चिरडून त्याच्या शरीरावर पाय ठेवून पुढे जंगलात धूम ठोकली. मुका मार बसल्याने जखमी झालेल्या शेतकऱ्याने कसेबसे घर गाठून यांची माहिती स्थानिकांना दिली.

अशी असते मेंढरे पळविण्याची आगळीवेगळी स्पर्धा... (व्हिडिओ)

घटनास्थळी पोचल्यानंतर बैलाच्या मागच्या डाव्या पायाचे हाड मोडल्याने बैल जमिनीवर निपचित, थरथरत पडला होता. या घटनेची माहिती वनखात्याला दिल्यानंतर माजगाव परिमंडळ अधिकारी पी. पी. सावंत, वनमजूर काळसेकर, उमेश गांवकर, महेश चव्हाण, संतोष तावडे यांनी पाहणी करून पंचनामा केला.

डावा पाय पूर्णतः जायबंदी झालेल्या बैलाला सांबरच्या हल्ल्यात जबर मार लागल्याने स्थानिक ग्रामस्थ अनिल रेडकर, पुनाजी पनासे, प्रवीण गोसावी, प्रकाश पनासे, प्रज्वल पनासे, सत्यवान वर्णेकर, संदीप वर्णेकर, शरद वर्णेकर, बाळू राणे, दिलीप वारंग, रवी कवठणकर, सुरेश बिले, श्रीराम वारंग, उमेश कवठणकर, विनायक वर्णेकर यांनी घरी आणले. 

स्थानिक शेतकरी गेले चक्रावून 

पट्टेरी वाघ, बिबट्या, गवेरेडे, रान डुक्कर, नदीतील मगरी यांच्याकडून गुरांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना ताज्याच आहेत; परंतु एखाद्या सांबराच्या कळपाकडून गुरांवर हल्ला करून त्याला जायबंदी केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच व दुर्मिळ घटना असेल. त्यामुळे स्थानिक शेतकरी सुद्धा चक्रावून गेले. इतर वेळा दुसऱ्या हिंसक प्राण्याकडून किंवा मानवी हालचालींनी घाबरणाऱ्या सांबराने बैलावर व माणसावर हल्ला करणे, ही कुतुहलाची घटना ओटवणेत घडली.  

वादळात दिवा लावणाऱ्या या आमदाराची दखल शिवसेना घेणार ? 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambar Deer Attack In Otavane In Sindhudurg