खासदारकी मिळवली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय?

खासदारकी मिळवली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय?

कणकवली -  नारायण राणेंनी स्वतःसाठी दिल्लीत जाऊन स्वतःसाठी खासदारकी मिळवून घेतली. हॉस्पिटलची परवानगी आणली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय? ते प्रश्‍न सोडविण्यात त्यांच्यासह आमदार नीतेश राणे देखील अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले.

येथील भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ""आमच्या आंदोलनाचा पोटशूळ स्वाभिमानच्या मंडळींमध्ये उठला आहे. खरं तर स्वाभिमान पक्ष हा केंद्राच्या आघाडीमधील घटक आहे. नारायण राणे यांनीही नरेंद्र मोदींनाच जाहीर पाठिंबा दिलाय. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील प्रश्‍न त्यांना सोडवता आले असते. पण राणे मंडळींनी वैयक्‍तिक प्रश्‍न सोडविण्यातच धन्यता मानली. जनतेला वाऱ्यावर सोडले. राणे पितापुत्रांनी स्वत:च्या फायद्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली; पण डॉक्‍टरांची रिक्‍तपदे, महावितरणच्या समस्या, हायवे बाधितांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांनी कधी खासदारकी, आमदारकी पणाला लावलीय का ?''

श्री. पारकर म्हणाले, ""कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. गावात वायरमन मिळत नाहीत. सरकारी रूग्णालयात डॉक्‍टर नाहीत. याबाबत आमदारांनी कधी आवाज उठवलाय का? कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना तुटपुंजा मोबदला मिळाला. मिळालेल्या मोबदल्यात पुनर्वसनही शक्‍य झाले नाहीत. त्यात आता वाहतूक कोंडी, धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. त्याबाबत आम्ही आवाज उठवायचा नाही तर शांत बसायचे का?'' 

इशारा देऊन प्रश्‍न सुटत नाहीत
हायवे अधिकाऱ्यांना "गाठ माझ्याशी आहे' असा इशारा देऊन प्रश्‍न सुटत नाहीत. तर सनदशीर मार्गानेच लढा द्यावा लागतोय. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढत आहोत. राणेंची गाठ कुणाशीही घट्ट राहिलेली नाही, अशी टीका देखील श्री. पारकर यांनी केली.

...तर हायवेचे काम बंद पाडणार
खारेपाटण ते झाराप या दरम्यान चौपदरीकरणाच्या अनेक समस्या आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी हायवे अधिकाऱ्यांनी आम्हाला तीन वेळा तारीख दिली. उद्या (ता.16) आम्ही शेवटची चर्चा करणार आहोत. यावेळी अधिकारी आले नाही तर जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडू असा इशारा संदेश पारकर यांनी दिला. ज्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या असतील त्या उद्या त्यांनी आणाव्यात असेही आवाहन श्री.पारकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com