संगमेश्‍वर तालुका शिवसेनेत 'यांचे' वजन पुन्हा सिद्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

संगमेश्‍वर तालुका पंचायत समिती सभापतीपदासाठी या वेळी जोरदार स्पर्धा झाली. निवडीआधी जया माने, माजी सभापती सुभाष नलावडे, राजेंद्र महाडीक यांचे बंधू आणि मुचरी पंचायत समिती गणाचे सदस्य बंडा महाडीक यांचेही नाव चर्चेत आले

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - येथील तालुका पंचायत समिती सभापती निवडीत शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक यांचाच वरचष्मा दिसून आला आहे. सभापती  - उपसभापती निवड महाडीक यांच्या मर्जीप्रमाणेच झाल्याने संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील त्यांचे वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

संगमेश्‍वर तालुका पंचायत समिती सभापतीपदासाठी या वेळी जोरदार स्पर्धा झाली. निवडीआधी जया माने, माजी सभापती सुभाष नलावडे, राजेंद्र महाडीक यांचे बंधू आणि मुचरी पंचायत समिती गणाचे सदस्य बंडा महाडीक यांचेही नाव चर्चेत आले तर माजी उपसभापती दिलीप सावंत यांनाही स्पर्धेत आणण्यात आले. एकापेक्षा एक असे चार सरस उमेदवार स्पर्धेत आल्याने सभापती निवडीचा पेच निर्माण होणे स्वाभाविक होते.

हेही वाचा - ...तर पाकव्याप्त काश्‍मीर निर्माणच झाला नसता 

नलावडेंनी नाकारले उपसभापतीपद

निवडीआधी एका रात्रीत चमत्कार झाला आणि निवडीच्या दिवशी सकाळी 10 वाजता बंडा महाडीक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे ही घोषणा वरिष्ठ पातळीवरून झाली. यात सभापतीपदासाठी महाडीक यांचे तर उपसभापतीपदासाठी सुभाष नलावडे यांचे नाव होते. मात्र, नलावडे यांनी उपसभापतीपद नाकारले. प्रेरणा कानाल निवडून आल्या. तर महाडीक बिनविरोध सभापती झाले. 

हेही वाचा - अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार 

शिवसेनेतही महाडीक यांनी दाखवले वजन

राजेंद्र महाडीक 10 वर्षे जिल्हाप्रमुख होते. संघटनेच्या पडत्या काळात त्यांनी संघटनेला नवी उभारी दिली होती. मात्र, त्यांचा संघटनेतील वाढता हस्तक्षेप काहींना नको होता. त्यातूनच त्यांना सहसंपर्क करून जिल्ह्यातून पर्यायाने तालुक्‍यातून बेदखल करण्याचा प्रयत्न सुरू होता. या सर्वांवर मात करत महाडीक यांनी वरिष्ठ पातळीप्रमाणेच संगमेश्‍वर तालुका शिवसेनेतील वजनही दाखवून दिले आहे. 

अंतर्गत विरोध होणार, हे निश्‍चित होते.. 

जिल्हाप्रमुख पदावरून राजेंद्र महाडीक यांना जिल्हा सहसंपर्क प्रमुख करून जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहातून बाजूला करण्याची खेळी करण्यात आली होती. त्यामुळे महाडीक यांचे संघटनेतील विशेषतः संगमेश्‍वर तालुक्‍यातील वजन कमी झाल्याचे भासवण्यात येत होते. यातूनच सभापतीपदाच्या निवडीत बंडा महाडीक यांना अंतर्गत विरोध होणार, हे निश्‍चित होते. या सर्वांची गणिते हेरून राजेंद्र महाडीक यांनी थेट वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आणि शेवटी त्यातच त्यांची सरशी झाली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangmeshwar Panchayat Sabhapati Selection On Mahadik Order Ratnagiri Marathi News