
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत बुधवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या संजना सावंत यांनी बहुमताने बाजी मारली. भाजपकडे 50 पैकी 31 सदस्यांचे बहुमत होते. त्या जोरावर सावंत यांनी शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासात सावंत यांना प्रथमच दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.
समीधा नाईक यांनी राजीनामा दिल्याने आज निवडणूक झाली. भाजपकडून इच्छुक मनस्वी घारे व सावंत यांच्यात चुरस होती. सावंत यांनी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण असताना अध्यक्षपद भूषविल्याने घारे यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. सध्या आरक्षण ओबीसी महिला राखीव आहे; परंतु सावंत माहेरकडून ओबीसी असल्याने त्या स्पर्धेत उतरल्या होत्या. भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी अखेर सावंत यांच्या नावाला पसंती दिली.
शिवसेनेने भाजपच्या नाराज सदस्यांना खेचण्याचे प्रयत्न केले. त्यात काही प्रमाणात यश मिळाल्याची चर्चा होती. याची कुणकुण आमदार नीतेश राणे यांना लागली. त्यांनी सदस्यांना पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या गेस्ट हाउसवर ठेवले. शिवसेनेनेही आपल्या काही सदस्यांना बांदा येथील एका हॉटेलमध्ये ठेवले होते. दोन्ही पक्षांनी आपलाच उमेदवार विजयी होणार, असा दावा केला होता.
पीठासन अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन यांच्या उपस्थितीत निवडीसाठी विशेष सभा झाली. आजारी असल्याने भाजपचे उत्तम पांढरे उपस्थित राहू शकले नाहीत. हात उंचावून मतदान झाल्यावर सिंघन यांनी सावंत यांना विजयी घोषित केले. त्या वेळी सभागृहाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी "हमारा नेता कैसा हो, नारायण राणे जैसा हो', "नीतेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा जोरदार घोषणा सुरू केल्या. शिवसेना सदस्य सभागृहाबाहेर येताना घोषणांचा आवाज आणखी वाढला. शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. यामुळे काही वेळ वातावरण तंग होते. शिवसेना सदस्य भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वाट काढत बाहेर पडले.
जिल्हा परिषद आवारात फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर झाला. आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपस्थित राहत सौ. सावंत यांना शुभेच्छा दिल्या.
...आणि चित्र स्पष्ट झाले
भाजप नेते, पदाधिकारी निवडीत कायम सस्पेंस ठेवतात. त्यामुळे लॉटरी कोणाला लागली, याबाबत अंतिम क्षणाशिवाय स्पष्ट होत नाही. आजही तोच सस्पेंस दुपारी सव्वाबारापर्यंत होता. कणकवली तालुक्यातील भाजप पदाधिकारी जिल्हा परिषदेत मोठ्या संख्येने दिसू लागले. याचवेळी सौ. सावंत यांना पुन्हा संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले. थोड्या वेळाने देसाई, रेश्मा सावंत, सरोज परब, संतोष सातविलकर व उमेदवार सावंत दाखल झाल्या. या वेळी उमेदवाराचे नाव जाहीर झाले.
आमदार नाईक जिल्हा परिषदेत
अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून कुडाळकर यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेने कुडाळकर व स्वरूपा विखाळे यांच्या नावे अर्ज घेतले होते. या वेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय आंग्रे, राजलक्ष्मी डिचवलकर, प्रदीप नारकर आदी उपस्थित होते. आमदार नाईक प्रथमच निवडणुकीनिमित्त जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.
शिवसेनेची वातावरण निर्मिती
सतीश सावंत शिवसेनेत गेल्यावर झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने स्वरूपा विखाळे यांच्या रूपाने उमेदवार महाविकास आघाडी म्हणून उभा केला होता. मात्र, या वेळी भाजपच्या समीधा नाईक विजयी झाल्या होत्या. आता नाईक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी निवडणूक जाहीर होताच शिवसेनेने पुन्हा तयारी केली. भाजपचे नाराज आपल्या संपर्कात असल्याचे सांगत वातावरण निर्मिती केली होती.
उपस्थितीवरून वादंग
शिवसेना सदस्य सभागृहात दाखल होत असताना सभागृहाबाहेर भाजप कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी होती. ते पाहून शिवसेनेचे सदस्य संजय पडते संतप्त झाले. पोलिस निरीक्षक कोळी यांना उपस्थित नागरिकांना बाहेर काढण्यास सांगितले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी "पडते आम्हाला बाहेर काढा म्हणून सांगणारे कोण', असा प्रश्न केला. यावर पडते यांनी सत्ता तुमची असली तरी दादागिरी चालणार नाही, असे सांगितले. पोलिसांनी उपस्थितांना तेथून बाजूला केले.
भाजपचे जिल्हा परिषद सदस्य निष्ठावंत आहेत. त्यामुळे डुबत चाललेल्या शिवसेनेच्या जहाजात बसून आत्महत्या कोण करणार? त्यामुळे आमच्या सदस्यांवर नजर ठेवण्याची आम्हाला गरज पडली नाही. आम्ही सर्व एकसंघ आहोत. श्री. नारायण राणे यांचा कार्यकर्ता म्हणून सर्वजण निष्ठेने काम करीत आहोत, हे आज अध्यक्षपद निवडीवरून स्पष्ट झाले.
- नीतेश राणे, आमदार, भाजप
जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आली नसली तरी आहे ती सत्ता टिकविण्यासाठी नारायण राणे यांना अधिवेशन सोडून दोन दिवस जिल्ह्यात राहावे लागले, यातच आमचे यश आहे.
- वैभव नाईक, आमदार, शिवसेना
संपादन : विजय वेदपाठक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.