esakal | पोषण आहार धान्य वितरणाचा आदेश रद्द करण्याची मागणी

बोलून बातमी शोधा

Sanjay Veturekar Comment On Nutrition Diet Grains Sindhudurg Marathi News

शालेय पोषण आहार अंतर्गत शाळा स्तरावरील शिल्लक धान्याचा साठा वितरण करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने काढलेला आदेश त्वरीत रद्द करण्यात यावा.

पोषण आहार धान्य वितरणाचा आदेश रद्द करण्याची मागणी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तळेरे ( सिंधुदुर्ग ) - शालेय पोषण आहार अंतर्गत शाळा स्तरावरील शिल्लक धान्याचा साठा वितरण करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने काढलेला आदेश त्वरीत रद्द करण्यात यावा. सध्या संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असताना धान्य घेण्यासाठी विद्यार्थी अथवा पालक शाळेत येणे म्हणजे संचारबंदीला छेद देणारे ठरेल, याबाबत आपल्या स्तरावरून सुचना देण्यात याव्यात, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. 

त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासन विभागाच्या संदर्भीय पत्रान्वये शालेय पोषण आहार ग्रामीण भागातील शाळांमध्ये वितरण करण्याच्या सूचना सर्व शाळांना प्राप्त झालेल्या आहेत. हा पोषण आहार वितरण करत असताना काही अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉक-डाऊन चा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचा काळ आहे.

संचार बंदीच्या काळात आपल्या घरात सुरक्षित असणाऱ्या मुलांना अथवा पालकांना शाळेत बोलावणे म्हणजे संचारबंदीचे उल्लंघन करणे होय. कोरोना प्रादुर्भावामुळे साथ नियंत्रण कायद्याचा भंग होईल. एसटी सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना शाळेत येणे शक्‍य होणार नाही. शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थ्यांना पालकांना निरोप मिळणे कठीण आहे.

काही शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे विद्यार्थी संख्या 400 पेक्षा जास्त असल्याने सर्वांना निरोप पोचणे फार दुरापास्त आहे. अशा परिस्थितीत पोषण आहार वाटप करण्याचा प्रयत्न केला तर पोषण आहार वाटपाचा उद्देश सफल होणार नाही असे वाटते. जिल्ह्यातील शाळांकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझर आणि पुरेशी मास्क सुविधा उपलब्ध नाही. तरी या सर्व बाबींचा विचार करून पोषण आहार साहित्य वाटप 15 एप्रिलनंतरच करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना व्हाव्यात, अशी मागणी श्री. वेतुरेकर यांनी केली आहे.