संजू परब म्हणाले, पालकमंत्र्यांनी यांचा आदर्श घ्यावा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

"जिल्ह्यात प्रशासन व पालकमंत्री यांचा ताळमेळ दिसून येत नाही. आज कित्येक परप्रांतीय उपाशीपोटी संकटाशी सामना देत आहेत; मात्र त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात नाही.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - पालकमंत्री उदय सामंत यांनी राजकीय रोष ठेवून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दमदाटी करण्यापेक्षा माजी पालकमंत्री भाई सावंत, प्रवीण भोसले व नारायण राणे यांचा आदर्श घ्यावा. सध्याच्या पालकमंत्र्यांचे प्रशासनावर लक्ष नाही. केवळ रस्त्यावर डांबर करण्याइतपत पालकमंत्री पदाचे काम सोपे नाही, असा टोला नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे लगावला. दिवस-रात्र कोरोनाबाबत काम करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांना केवळ पालकमंत्र्यांच्या हट्टापायी आज केसरकर यांनी दिलेले मास्क त्यांच्या नावाच्या लिफाफ्यामध्ये भरण्याचा प्रकार करावा लागत असल्याचा दावा श्री. परब यांनी केला. 

नगराध्यक्ष परब यांनी आज पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सामंत यांच्यावर टीका केली. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी आदी उपस्थित होते. 

नगराध्यक्ष परब म्हणाले, ""जिल्ह्यात प्रशासन व पालकमंत्री यांचा ताळमेळ दिसून येत नाही. आज कित्येक परप्रांतीय उपाशीपोटी संकटाशी सामना देत आहेत; मात्र त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात नाही. मंगळवारी रात्री कर्नाटक येथे जाणाऱ्या 26 परप्रांतीयांना बावळाट येथे प्रशासनाने ताब्यात घेऊन पुन्हा सावंतवाडीमध्ये आणून सोडले; मात्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला धान्य मिळत नाही तसेच प्रशासनाची ऑनलाईन पास प्रक्रियाही लक्षात येत नाही. ठेकेदारही विचारत नाही. त्यामुळे आम्हाला घरी जाऊद्या, असे सांगण्यात आले; मात्र प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हा प्रकार चुकीचा असून याबाबत येथील प्रशासनाने जातीनिशी लक्ष देणे गरजेचे आहे. आंबोली येथे असलेल्या परप्रांतीयांनी आपल्याकडे कोण लक्ष देत नाही तसेच जेवणाची व्यवस्था करत नाही, यासाठी एक दिवसाचे उपोषणही केले होते. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी हे उपोषण मागे घेण्यास लावले; मात्र उपोषण करणे म्हणजेच पालकमंत्र्याचा प्रशासनावर लक्ष नसल्याचे समोर येते.'' 

श्री. परब पुढे म्हणाले, ""पालकमंत्री सामंत यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दीपक केसरकर यांच्या नावाच्या लिफाफ्यामध्ये मास्क भरा असे सांगण्यापेक्षा कोरोनाबाबत सूचना करणे गरजेचे होते. त्यांनी ओरोस येथे ठेकेदारांची बैठक घेण्यापेक्षा सावंतवाडी पालिकेमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शक सूचना करायला हवी होती. आम्ही स्वखर्चातून आणि पालिका निधीतून मास्क वाटप करून कुठल्याही प्रकारचे राजकारण केले नाही; मात्र केसरकर यांनी दिलेले मास्क वाटपाचे राजकारण याठिकाणी केले जात आहे.'' 

त्यांची दखल काय घ्यायची 
गेली 23 वर्ष ज्यांनी पालिकेमध्ये सत्ता भोगली त्या सत्ताधाऱ्यांनी नुसत्या खुर्च्या तापवण्याचे काम केले. आता आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत पाऊल टाकले असताना त्यांच्याकडून सहकार्याची भूमिका मिळत आहे; मात्र इतकी वर्ष त्यांनी पालिकेमध्ये राहून काय केले ? आम्ही चार महिन्यात निदान हा विषय तरी हाती घेतला. त्यामुळे पालिकेमध्ये उडाणटप्पूंचा अड्डा झाला असे म्हणणाऱ्या व दोन टक्‍क्‍यावर ज्यांचे घर चालते त्या व्यक्तीवर आपण बोलणार नाही, असे सांगून त्यांनी नाव न घेता शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या टिकेला उत्तर दिले. 

सात ते सात दुकाने सुरू 
कोरोनाच्या संकटात सामना करताना येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी पालिकेला चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे; मात्र कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याने शहरातील दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात अशी सुरू राहणार आहेत. शिवाय एक दुकान सोडून एक अशी दुकाने सुरू राहणार आहेत. पालिकेच्या निर्णयाला सावंतवाडीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष परब यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanju Parab Says Guardian Minister Should Follow These Example