पोर्तुगीजांना केले "सळो की पळो' 

sansthan history sawantwadi konkan sindhudurg
sansthan history sawantwadi konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - संस्थानातील महापराक्रमी योद्धा म्हणून जयराम सावंत यांची ओळख आहे. फोंड सावंत दुसरे यांनी हयात असतानाच रामचंद्र सावंत यांना गादीवर बसवले होते. त्यांच्या पश्‍चात रामचंद्र सावंत आणि त्यांचे काका जयराम सावंत यांनी मिळून सत्ताकारभार पाहत राज्यांचा विस्तार वाढवला. विशेषतः सावंतवाडी संस्थानासाठी डोकेदुखी ठरलेल्या पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडले. 

सावंतवाडी संस्थानचा कारभार रामचंद्र सावंत आणि जयराम सावंत यांनी 1738 ते 1755 या काळात संयुक्‍तपणे पाहिला. ही कारकीर्द संस्थानच्या साम्राज्य विस्ताराची होती. फोंड सावंत दुसरे यांच्या निधनावेळी रामचंद्र सावंत 26 वर्षांचे होते. ते लहान असतानाच फोंड सावंत दुसरे यांनी त्यांना राजगादीवर बसवले होते. त्यांच्या पश्‍चात रामचंद्र सावंत आणि जयराम सावंत कारभार पाहू लागले. 
जयराम सावंत हे धिप्पाड, शूर आणि पराक्रमी योद्धा होते.

सावंत कुळातील सर्वांत पराक्रमी योद्धा असे त्यांचे वर्णन काही संदर्भात आढळते. सावंतवाडी संस्थानचे मधल्या काळात गेलेले वैभव त्यांनी परत मिळवले. शिवाय त्याचा विस्तारही केला. सैन्य आणि आरमाराची ताकद वाढवली. यामुळे त्यांच्या काळात सावंतवाडी संस्थानचे वैभव शिखरावर होते. गोव्यात स्थिरावलेल्या पोर्तुगीजांशी सावंतवाडी संस्थानचा संघर्ष सुरूच होता. तिकडे पेशवाई सुरू झाली होती. बाजीराव बल्लाळ त्या काळात पेशवे होते. वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी पेशव्यांचा प्रयत्न चालू होता. पेशवे पोर्तुगीजांना जेरीस आणायच्या प्रयत्नात होते. सावंतवाडीकर पोर्तुगीजांचे पारंपरिक शत्रू असल्याने पेशवे आणि सावंतवाडीकरांचा स्नेह आणखी वाढला. 

या पार्श्‍वभूमीवर जयराम महाराजांनी 1738 मध्ये पोर्तुगीजांवर स्वारी केली. त्यांच्यासोबत 2200 घोडेस्वार होते. डिचोली आणि साखळी हे दोन्ही आपले महाल सावंतवाडीकरांनी परत मिळवले. पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालील बार्देस प्रांतावर स्वारी करून तोही ताब्यात घेतला. पोर्तुगीजांचे सैन्य अगदीच तोकडे पडल्यामुळे सावंतवाडीकरांना हा विजय सहज मिळाला. या स्वारीत पोर्तुगीजाच्या बऱ्याच तोफा, निशाणे सावंतवाडीकरांना मिळाली. या स्वारीत मिळालेले डिचोली आणि साखळी महाल आधी सावंतवाडीच्याच अधिपत्याखाली होते; मात्र बार्देस हा पोर्तुगीजांकडचा प्रांत सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला होता. या स्वारीत पांडुरंग विश्राम सबनीस आणि जीवाजी विश्राम सबनीस हे दोघे बंधू जयराम महाराजांसोबत होते. बार्देसच्या व्यवस्थेसाठी या दोघांनाही तेथे ठेवून महाराज सावंतवाडीत परतले. काही दिवसांनी जीवाजी सबनीस हेही सावंतवाडीत आले; मात्र पांडुरंग सबनीस पुढे अनेक वर्षे तिथेच राहिले. 

तिकडे पेशव्यांचेही पोर्तुगीजांशी युद्धा सुरूच होते. अखेर पोर्तुगीजांनी पेशव्यांसमोर हार मानली आणि वसईचा किल्ला त्यांच्या स्वाधीन केला. 2 मे 1739ला पेशवे आणि पोर्तुगीजांमध्ये तह झाला. त्यात पेशव्यांनी सावंतवाडीकरांसाठीही बरंच काही मागून घेतलं. यात गोव्यातील उत्तेरेकडे असलेली खोरजुवे आणि पांडिवे ही बेटे पोर्तुगीजांनी सावंतवाडीकरांना द्यावी. आधी झालेल्या पोर्तुगीज-सावंतवाडीकर तहात ठरलेले दरवर्षीचे पोर्तुगीजांना द्यावे लागणारे 1000 झेऱ्याफिन यापुढे देवून नये. साष्टी, बार्देस या भागातील एकमेकांचे कैदी खंडणी न घेता सोडून द्यावे. कैद्यांनी आपल्या स्वातंत्र्याची फारकत लिहून दिली असल्यास ती त्यांची परत करावी असे ठरले; मात्र या तहानंतर बार्देस प्रांत पोर्तुगीजांना परत मिळाला. 

हा काळ पोर्तुगीजांसाठी खूपच वाईट होता. पोर्तुगीजांच्याच कागदपत्रात याचे वर्णन आढळते. यानुसार 6 एप्रिल 1737 ते 13 फेब्रुवारी 1740 या दरम्यान पोर्तुगीजांच्या ताब्यातील चार मुख्य बंदरे, 340 गावे असलेली सुमारे 2300 पौंड वसुलीची वरसेवापासून दमणपर्यंतची 66 मैल लांबीची पट्टी, वसईचा किल्ला, शिवाय आणखी आठ शहरे, 20 किल्ले, दोन तटबंदी केलेले डोंगर, ठाण्याचा किल्ला, ठाणे शहर, साष्टी बेट, जुवा किंवा करंजाबेट आणि गोव्यातील साष्टी, बार्देस हे प्रांत गेले. पोर्तुगिज गव्हर्नरच्या ताब्यात सहा मैल लांबीचे व अठरा मैल रूंदीचे गोव्याचे बेट, चोडण, दिवाडी, कुंभारजुवा व अंजेदीव बेट इतकाच मुलुख राहिला. 

1740च्या सुरूवातीला सावंतवाडीकरांनी पुन्हा बार्देसवर स्वारी केली. त्यावेळी गोव्याचा गव्हर्नर डॉम पेट्रो म्यास्केरेन्हास होता. त्याने सावंतवाडीकरांचे सैन्य पुढे यायला दिले नाही. 27 फेब्रुवारी 1740ला पोर्तुगीज आणि सावंतवाडीकरांमध्ये तह झाला. यात असे ठरले, की सावंतवाडीकरांची जी गलबते मस्कतला जातात त्यावर पोर्तुगीजांनी हल्ले करू नये. पोर्तुगीजांनी बाजारभावाने सावंतवाडीकरांना दारू पुरवावी, पोर्तुगीजांनी भोसलेंच्या शत्रूला आश्रय देवू नये, खोर्जुवे बेट सावंतवाडीकरांचे आणि पनेळे बेट पोर्तुगीजांचे आहे असे समजावे; मात्र पोर्तुगीजांनी मिळालेल्या बेटावर किल्ला बांधू नये. भोसलेंनी दिलेल्या पनेळे बेटाच्या बदल्यात पोर्तुगीजांनी बार्देस प्रांतातील पिरणे हा गाव सावंतवाडीकरांना द्यावा असे ठरले. शिवाय तहात पोर्तुगीजांकडून सावंतवाडीकरांना 25,000 रूपये खंडणीही मिळाली. तहाच्या अटी अंमलात येईपर्यंत पोर्तुगीजांतर्फे दाबक फिरंगी हा व्यक्‍ती सावंतवाडीकरांकडे ओलीस होता. 

गोव्यातील सौंद्याचा राजा पोर्तुगिजांचा मांडलीक होवून सावंतवाडीकरांचा शत्रू झाल्याचे संदर्भ याआधी आले आहेतच. जयराम महाराजांनी सौंद्यावर हल्ला करण्याची योजना 1743 मध्ये आखली. बार्देसमध्ये थांबलेले पांडुरंग सबनीस मग साखळी, डिचोली भागाची व्यवस्था बघायचे. त्यांना महाराजांनी बांद्यात बोलावून घेतले. त्यांना हेवाळकर, उसपकर देसाई, भीमगडकरी, साखळीकर राणे आदी सरदारांची पथके सोबत आणायला सांगितले. बांद्यात बऱ्यापैकी सैन्य जमले. जयराम महाराज 12 एप्रिल 1743ला सावंतवाडीतून निघाले. 25 एप्रिल 1743 पर्यंत सैन्यांची जमवाजमव केली जात होती. त्याच दिवशी सौंद्याकडे प्रस्तान करण्यात आले; पण या स्वारीत फारसे काही हाती लागले नाही. 

पराक्रमी योद्धा 
जयराम सावंत खूप धिप्पाड होते. ते उत्तम लढवय्ये होते. ते युद्धात वापरत असलेले चिलखत सावंतवाडीतील पूर्वीच्या वेस्टॉप म्युझियममध्ये ठेवले होते. हे म्युझीयम आताच्या कोर्ट असलेल्या इमारतीच्या परिसरात होते. तेथे एक भव्य प्रवेशद्वारही होते. मध्यंतरी आलेल्या पुरात या म्युझियमचे मोठे नुकसान झाले. यामुळे जयराम महाराजांच्या चिलखतासह काही वस्तू कोल्हापुरच्या टाऊन हॉल म्युझियममध्ये स्थलांतरीत करण्यात आल्या. हे चिलखत पाहून महाराजांच्या विशाल देहयष्टीची कल्पना येते.  

 संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com