नूतनीकरण प्रस्ताव धूळखात; सरमळे पूल मोजतोय शेवटची घटका

महेश चव्हाण
Monday, 21 September 2020

दाभिल नदीवरील या पुलाच्या खाबांसह, वरच्या भागाला तडे तसेच मोठ मोठे खड्डे पडल्याने पूल अतिशय कमकुवत झाला आहे.

ओटवणे (सिंधुदुर्ग) - बांदा-दाणोली या जिल्हा परिषदेच्या मार्गावरील दाभिल नदिवरील सरमळे पूल शेवटची घटका मोजत असून पुलाच्या नूतन बांधकामाचा प्रस्ताव मात्र धूळखात पडुन आहे. या ठिकाणी नवे पूल उभारावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु शासनाच्या दुर्लक्षपणामुळे पुलाची दुरवस्था अधिकच वाढत असून पूल कोसळण्याची भीतीही प्रवाशांमधुन व्यक्त होत आहे. दाभिल नदीवरील या पुलाच्या खाबांसह, वरच्या भागाला तडे तसेच मोठ मोठे खड्डे पडल्याने पूल अतिशय कमकुवत झाला आहे. बारामाही वाहणाऱ्या दाभिल नदीवरील या पुलाची ऊंची कमी असल्याने थोड्या अधिक पावसात हे पूल वारंवार पाण्याखाली असते. 

दाभिल, तेरेखोल, गडनदीचा त्रिवेणी संगम या पुलाच्या 100 मिटर अंतरावर आहे. गडनदीला पूर आल्यानंतर त्याचा उलट परिणाम दाभिल नदीच्या प्रवाहावर होवून या पुलावर अधिकच पाण्याचा जोर वाढतो. त्यामुळे थोड्या पावसातही हे पूल पाण्याखाली असते. सततच्या पाण्याच्या माऱ्यामुळे पुलाच्या क्रॉंक्रीटचे टुकडे पडून आतल्या शिगा, लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. पुलावर खड्ड दिसू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. 

बांदा दाणोली मार्ग हा दोन महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांना जोडतो. आंबोली व गोवा राज्य या दोन पर्यटन ठिकाणांना जोडणारा हा पर्यायी व सुलभ मार्ग, असे संबोधले जाते. आंबोली या थंड हवेच्या तसेच फेसाळणाऱ्या धबधब्याखाली मनमुराद आनंद घेण्यासाठी गोव्याच्या पर्यटकांची या मार्गावरुन मोठी वर्दळ असते. 

कोल्हापूर, बेळगाव, पुणे येथून कच्चा माल, भाजीपाला गोव्याला नेण्यासाठी अवजड वाहनांची रेलचेल या मार्गावर असते. अशा या महत्वपूर्ण मार्गावरील सरमळे पुलामुळे मात्र वाहन चालकांची डोकेदुखी वाढत आहे. पावसाळ्यात कित्येकदा वाहन चालकांना माघारी परतून 35 ते 40 किलोमिटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. 

या पुलावरुन टेम्पो वाहून गेल्याचीही घटना 2 वर्षांपूर्वी घडली होती. त्यात चालक सुदैवाने वाचला तर कोल्हापूर येथील कुटुंबाची गाडी पुलावरील पाण्यात फसली असताना स्थानिकांनी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला होता. अशा घटना वारंवार घडूनही प्रशासनाला मात्र जाग येत नाही. या पुलाच्या दुतर्फा संरक्षक कठडेही नाहीत किंवा सूचना फलकही नाही. त्यामुळे धोका अधिकच वाढतो. 

महाड दुर्घटनेची पुनरावृत्ती नको 
महाड येथील सावित्री पुलाची दुर्घटना घडल्यानंतर तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा पुलांचा सर्व्हे करून त्याचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्या 6 महिन्यांच्या कालावधीत केवळ अशा पुलांच्या नवीन बांधकामाचा गाजावाजा झाला; मात्र कार्यवाही होताना दिसली नाही. पुलाची दुरवस्था पाहता महाड दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची प्रशासन वाट पाहते की काय? असाच संतप्त प्रश्‍न स्थानिक विचारत आहेत. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarmale bridge condition is bad