ऐतिहासिक गढी मोजतेय अखेरच्या घटका

रवींद्र साळवी
शनिवार, 20 मे 2017

लांजा - छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्‍यातील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून उदयास आलेल्या तालुक्‍यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढी सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा हाच पुरावा आहे.

लांजा - छत्रपती शिवरायांच्या काळात जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्‍यातील प्रमुख व्यापारी ठाणे म्हणून उदयास आलेल्या तालुक्‍यातील साटवली येथील ऐतिहासिक बंदर आणि गढी सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा हाच पुरावा आहे.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात व मुचकुंदी नदीकिनारी साटवली वसले आहे. ते नावाजलेले बंदर होते. मुचकुंदी विशाळगड येथून उगम पावून प्रभानवल्ली, भांबेड, वाकेड, इंदवटीमार्गे सडवली, दसूरकोंडमार्गे साटवलीमध्ये येते. तेथील गढी म्हणजे माल उतरवण्यासाठीचा छोटासा किल्ला होता. तेथून १०० मीटरवर गलबते लागत. माल उतरविण्यासाठी येथे धक्काही बांधण्यात आला. तेथून बैलांच्या पाठीवरून सामान विशाळगडला नेत. त्यामुळे साटवली बंदराला विशेष महत्त्व होते. माल उतरवण्याची व साठवण्याची व्यवस्था असल्याने ‘बंदरसाठा’ या नावानेही त्याची ओळख होती. येथे उतरवलेला माल ६० ते ७० गावांमध्ये जात असे. व्यापाराचे मुख्य व मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे गाव साठवली व त्याचा अपभ्रंश साटवली असा झाला.

शिवाजी महाराजांनी कोकणात मोहीम आखून राजापूरची वखार लुटली. व्यापाराच्या दृष्टीने भरभराटीस आलेली साटवली गढी ताब्यात घेण्यासाठी एक सुभेदार पाठविला. मराठी सैन्य येत असल्याचे कळताच मोगल सुभेदार सैन्यासह जीव वाचवण्यासाठी महंमदवाडीच्या डोंगरातील गुहेत लपला. तो जेथून पळाला त्या वाडीला महंमदवाडी असे म्हणतात. असे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या साटवली गढीची अत्यंत दारुण अवस्था झाली आहे. 

या ऐतिहासिक ठेव्याकडे जाण्यासाठी ना चांगला रस्ता, ना पायवाट. तेथे केवळ दिसतात ते गढीचे भग्न अवशेष. या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याच्या दृष्टीने पुरातत्त्व विभागाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे हे बंदर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. 

दुरवस्थेबाबत कुणालाही खंत नाही
सध्या या भग्नावस्थेतील गढीला झाडाझुडपांनी आच्छादले आहे. प्रवेशद्वाराची पडझड झाली आहे. पशुपक्ष्यांचाच वावर येथे दृष्टीस पडतो. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या या पुरातन गढीच्या दुरवस्थेबाबत लांजा तालुक्‍यात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गढीच्या दुरवस्थेबाबत ना लोकप्रतिनिधींना खंत, ना शासनाला.

Web Title: satavali historical place condition