समाधानकारक ! पीक विमाधारकांत सिंधुदुर्गात तिप्पट वृद्धी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

नैसर्गिक आपत्ती, कीडरोग यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत खरीप हंगामातील भात व नागली या पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई, त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने शासनाकडून ही योजना 2015-16 पासून कार्यान्वित केली आहे.

सिंधुदुर्गनगरी - खरीप हंगामासाठीच्या पीकविमा योजनेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तिप्पट शेतकरी सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी 760 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता; तर यंदा दोन हजार 512 शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला आहे. खरीप हंगाम विमा योजना सुरू झाल्यापासूनचा हा सर्वाधिक आकडा असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. दोन हजार 512 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होत 440 हेक्‍टर क्षेत्र संरक्षित केले आहे. विमा कंपनीने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी चांगले सहकार्य दिल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होते. 

नैसर्गिक आपत्ती, कीडरोग यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीत खरीप हंगामातील भात व नागली या पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपाई, त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेवण्याच्या हेतूने शासनाकडून ही योजना 2015-16 पासून कार्यान्वित केली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीतील हा विक्रमी सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 

गेल्या वर्षीपर्यंत ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होती; तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र ती ऐच्छिक स्वरूपाची होती. यंदा निकषात बदल करीत शासनाने कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक असल्याचे जाहीर केले आहे. ऐच्छिकतेची संधी दिली गेल्याने यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येबाबत जर-तरची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या वेळी विक्रमी सहभाग झाल्याचे दिसून येत आहे. 

शासनाने यंदा विमा कंपनी बदलली असून, इको टोकियो या विमा कंपनीची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. या कंपनीने प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्हास्तरावर एक, तर प्रत्येक तालुकास्तरावर एक असे एकूण नऊ विमा प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. 

चार लाखांवर विमा हप्ता 
गेल्या वर्षी भातपिकाच्या 313 कर्जदार शेतकऱ्यांनी 131.96 हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. बिगर कर्जदार 436 शेतकऱ्यांनी 88.24 हेक्‍टर, तर नागलीच्या 11 शेतकऱ्यांनी 1.14 हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. यंदा दोन हजार 512 शेतकऱ्यांनी 440 हेक्‍टर क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेतले आहे. चार लाख चार हजार रुपये विमा हप्ता भरण्यात आला असून, नुकसान झाल्यास दोन कोटी दोन लाख रुपये विमा कंपनीकडून दिले जाणार आहेत. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfactory Triple Increase In Crop Insurance Holders In Sindhudurg