भक्ष्याच्या शोधात आली अन् विहिरीत पडली, भर पावसात रेस्क्यू मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

विहीरीला लागुन असलेला बंद पाण्याच्या मोटारीला मधमाशांचे पोळ होते. ते या हालचालीमुळे आक्रमक झाले.

मणेरी (सिंधुदुर्ग) - मणेरी येथे वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यूच्या टिमने मोहीम राबवत अनेक दिव्य पार करून विहीरीत अडकलेल्या मगरीला वाचवले. भर पावसात राबवलेली ही मोहीम कौतुकाचा विषय ठरली. 
मणेरी गावात परब कुटुंबियांच्या विहीरीत सात ते आठ दिवसांपुर्वी आठ ते दहा फुटाची मगर भक्ष्याच्या शोधात पडल्याची चर्चा गावभर होती.

ज्यावेळी वाईल्ड लाईफ ईमरजन्सि रेस्क्‍यु सर्विसेसचे दोडामार्गचे सदस्य राहुल निरलगी यांच्या कानावर ही बाब आली तेव्हा त्यांनी याची माहिती अध्यक्ष अनिल अच्युत गावडे आणि उपाध्यक्ष आनंद बाळा बांबर्डेकर यांना दिली. दुसऱ्याच दिवशी संस्थेचे सचिव वैभव अमृस्कर आणि सहसचिव ओमकार लाड यांनी विहीरीची पाहणी केली.

पावसाळ्यात विहीरीतील पाणी उपसणे म्हणजे महाकठिण काम; पण हे आव्हान त्यांनी स्वीकारले. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमाराच रेस्क्‍यु टीम  मणेरीत दाखल झाली. काम सुरु करणार एवढयात टीम समोर नवीन संकट उभ राहीले. विहीरीला लागुन असलेला बंद पाण्याच्या मोटारीला मधमाशांचे पोळ होते. ते या हालचालीमुळे आक्रमक झाले. टीम वर आणि काही स्थानिक लोकांवर या मधमाशांनी हल्ला चढवला. यातुनही मार्ग काढत मोटर चालु करुन विहीरीतील पाण्याचा उपसा सुरू केला. पाणी कमी होत होतं तस तसा पावसाचा जोर पण वाढत होता. त्यामुळे झऱ्यातुन पाणीही मोठ्या प्रमाणात येत होत. पाण्याची पातळीही वाढत होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर मोटर सुरू करण्यात संजयकुमार कुपकर यांना यश आले. 

टीमचे कौतुक 
पाणी कमी झाल्यावर आनंद बांबर्डेकर यांनी स्वतः विहीरीत उतरुन मगरीला वायझरमध्ये अडकवले. नंतर लगेचच रेस्क्‍यु टीम विहीरीत उतरुन मगरीला सुरक्षितरित्या जेरबंद करुन वनरक्षक अरुण खामकर व वनमजुर अजय कुबल यांच्या मदतीने बाहेर काढले. स्थानिकांनी या टीमचं कौतुक केले. मगरीला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीने वनअधिकाऱ्यांच्या समक्ष निसर्ग अधिवासात सोडले. अनिल गावडे, आनंद बांबर्डेकर, वैभव अमृस्कर, ओमकार लाड, डॉ. प्रसाद धुमक, दिवाकर बांबर्डेकर, राहुल निरलगी, एकनाथ तळवडेकर आदी उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saved the crocodile in maneri konkan sindhudurg