esakal | व्यापाऱ्यांचे शिवसेनेला धरून 'येथे' राजकारण 
sakal

बोलून बातमी शोधा

Sawantwadi Businessman Doing Issue Of Market With Support Of Shivsena

आठवडा बाजार उभाबाजर येथून जिमखाना मैदान येथील नव्या जागेत हलविण्यात आल्यापासून पालिका व व्यापारी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यात शिवसेना व कॉंग्रेसने उडी घेत बाजार पुन्हा जिमखाना येथे भरविल्यास व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरू, असा इशारा श्री. पडते व श्री. गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला होता.

व्यापाऱ्यांचे शिवसेनेला धरून 'येथे' राजकारण 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील आठवडा बाजार जिमखाना येथे हलविल्यावरून व्यापारी वर्ग शिवसेनेला धरून राजकारण करत आहे. यात संजय पडते संकासुराची व बाळा गावडे बिलीमाऱ्याची भुमिका बजावत आहेत; मात्र कोणीही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आठवडा बाजार हा जिमखाना येथेच भरविला जाणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

येथील आठवडा बाजार उभाबाजर येथून जिमखाना मैदान येथील नव्या जागेत हलविण्यात आल्यापासून पालिका व व्यापारी यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यात शिवसेना व कॉंग्रेसने उडी घेत बाजार पुन्हा जिमखाना येथे भरविल्यास व्यापाऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरू, असा इशारा श्री. पडते व श्री. गावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला होता. या दोघांच्या भुमिकेचा आज श्री. परब यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, केतन आजगावकर उपस्थित होते. 

श्री. परब म्हणाले, ""येथील जनतेने माझ्यावर विश्‍वास ठेऊन मला निवडून दिले. त्या जनतेचा विचार करता त्यांना अभिप्रेत असेच काम मी करणार. आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्यावरून येथील जनतेची कोणतीही प्रतिक्रिया नाही. दोन दिवसात या निर्णयाबाबत भरभरून प्रतिक्रीया आल्या. अनेक नागरिक, संघटना, राजकिय पदाधिकारी यांनी आपला सत्कार केला; मात्र व्यापारी वर्ग शिवसेनेला मध्ये घेऊन राजकारण करत आहे. व्यापाऱ्यांना आपल्या मागण्या मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे; पण शिवसेनेला धरून कोण राजकरण करत असेल तर मी त्यांना भीक घालणार नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून आठवडा बाजार ज्या जिमखाना मैदानावर हलविण्यात आला ती जागा आता बदलणार नाही आणि कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.'' 

श्री. परब पुढे म्हणाले, ""शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. पडते व कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. गावडे यांनी आठवडा बाजारावरून आपल्यावर टिका केली; मात्र यातील एक संकासुराची तर दुसरा बिलीमाऱ्याची भुमिका बजावत राजकारण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. या दोघांना शहराबद्दल मुळात काहीच माहीती नाही. त्यामुळे उगाच रस्त्यावर उतरण्याची धमकी त्यांनी मला देऊ नये. मी सुद्धा नारायण राणे यांच्या मुशीतून घडलेला कार्यकर्ता आहे. मी जी भुमिका घेणार ती जनतेच्या हिताच्याच दृष्टीने असणार. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या नादी न लागता आपला वेळही फुकट घालवू नये.'' 
ते म्हणाले, ""श्री. पडतेंनी शिवसेच्या नगरसेवकांना चुकीची माहिती देऊन जिमखान्यावर बाजार हलविला, असा आरोप केला होता; मात्र शिवसेनच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी या निर्णयाचे समर्थन करत सर्व नगरसेवक आपल्या पाठीशी आहेत, असे सांगुन पत्रकार परिषेदत सहभाग घेतला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक येणाऱ्या मासिक बैठकित आठवडा बाजार पुन्हा उभाबाजार येथे येण्यासाठी ठराव मांडणार, असे सांगत असतील तर त्यांचा ठरावाला आम्ही जुमानणार नाही.'' 

स्वराज्य संघटनेतर्फे नगराध्यक्षांचा सत्कार 
पालिकेने उभाबाजार येथील आठवडा बाजार जिमखाना येथील नव्या जागेत हलविला. या निर्णयाचे समर्थन करत आज येथील स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष परब यांची भेट घेत त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पालिका सत्ताधाऱ्यांनी नागरिक, ग्राहक, ट्राफिक समस्या तसेच महिलांची होणारी छेडछाड या सगळया गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वांचा विचार करता ही जागा योग्य असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. संघटनेचे अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, अतुल केसरकर, पॅट्रीक डिसोजा, भुषण सावंत, विनोद सावंत, प्रमोद सुभेदार, मिलिंद देसाई, अमित गवंडळकर, शैलेश तावडे, महेश पांचाळ, राजू कासकर आदी उपस्थित होते. 

loading image